स्मार्ट शिक्षणाची स्वप्नं, पण वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:07 IST2025-08-05T16:03:13+5:302025-08-05T16:07:21+5:30
Nagpur : वर्गखोल्यांचे स्लॅब उखडतायत, शिक्षणासाठी हव्यात तातडीच्या दुरुस्त्या!

Dreams of smart education, but classrooms in disrepair
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर: शाळेत चांगल्या आणि आधुनिक सुविधांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सकारात्मक परिणाम होतो. सुसज्ज वर्गखोल्या, आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य वातावरणामुळे विद्यार्थ्यांचा शिकण्यात अधिक रस निर्माण होतो आणि त्यांना चांगले शिक्षण मिळते. अशाच सुसज्ज वर्गखोल्यांची गरज सध्या परसोडी (वकील) या शाळेला असून, शासनाने या मागणीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
परसोडी (वकील) ही जिल्हा परिषदेची केंद्रीय शाळा असून, येथे सात वर्गातून ५३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेला प्रशस्त मैदान असून, येथे एकूण आठ वर्ग खोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. यापैकी सद्यःस्थितीत चार वर्गखोल्या जीर्ण झालेल्या असून, त्या उपयोगाअभावी पडून आहेत तर उर्वरित चार वर्गखोल्यांपैकी केवळ दोन वर्गखोल्या सुस्थितीत आहेत.
इतर दोन वर्गखोल्यांना दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. या झाले वर्गखोल्यांचे स्लॅब उखडणे सुरू असून, वर्गखोल्यांची वेळेत दुरुस्ती न केल्यास अल्पावधीतच विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण जाणार आहे.
सुसज्ज वर्गखोल्या उपयुक्त
आधुनिक वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांचा शिकण्यात अधिक सहभाग होतो, कारण त्यांना प्रश्न विचारणे आणि चर्चा करणे सोपे जाते. चांगल्या सुविधांमुळे विद्यार्थ्यांची शिकण्याची गुणवत्ता सुधारते. त्यांना चांगले शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मिळतात. सुसज्ज वर्गखोल्या शिक्षकांसाठी अधिक सोयीस्कर आणि प्रभावी शिक्षण देण्यासाठी उपयुक्त ठरतात.
पटसंख्या ५३
या शाळेत इयत्ता पहिलीमध्ये नऊ, दुसरीमध्ये आठ, तिसरीत आठ, चौथीत १२, पाचवीत सात, सहावीत चार तर इयत्ता सातवीमध्ये पाच अशी एकूण ५३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी चार शिक्षक कार्यरत आहेत.
"सुसज्ज वर्गखोल्या, पुरेसा प्रकाश, चांगली हवा आणि आकर्षक रंगसंगती, विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक आणि उत्साही शिक्षण वातावरण तयार करतात. आधुनिक वर्गखोल्यांमध्ये प्रोजेक्टर, स्मार्टबोर्ड आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी यासारख्या सुविधांमुळे शिक्षकांना अधिक प्रभावीपणे शिकवता येते."
- कुलदीप पावनकर, मुख्याध्यापक, केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा, परसोडी (वकील)