डॉ. विठ्ठलराव जीभकाटे : योगाचा कल्पवृक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 21:04 IST2019-04-24T21:01:41+5:302019-04-24T21:04:04+5:30
विचार किंवा संकल्प उच्च दर्जाचा असेल आणि त्यानुसार प्रयत्न असतील तर आपणच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास उत्तम तऱ्हेने करू शकतो आणि आपले वेगळेपण जगाला सांगू शकतो. हे असे वेगळेपण जपणाऱ्या व्यक्तीमध्ये योगमहर्षी विठ्ठलराव जीभकाटे यांचा उल्लेख करावा लागेल. सहा-सात दशकांपासून विठ्ठलरावांची योगसाधना बघितल्यावर ही व्यक्ती जनसामान्यांच्या विचारसरणीपासून फार दूर तर ईश्वराला अभिप्रेत असलेल्या नरनारायण सेवेच्या अतिशय निकट असल्याचे जाणवते. आज त्यांनी नव्वदावी पूर्ण करून शतकीय वाटचाल सुरू केली आहे.

डॉ. विठ्ठलराव जीभकाटे : योगाचा कल्पवृक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विचार किंवा संकल्प उच्च दर्जाचा असेल आणि त्यानुसार प्रयत्न असतील तर आपणच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास उत्तम तऱ्हेने करू शकतो आणि आपले वेगळेपण जगाला सांगू शकतो. हे असे वेगळेपण जपणाऱ्या व्यक्तीमध्ये योगमहर्षी विठ्ठलराव जीभकाटे यांचा उल्लेख करावा लागेल. सहा-सात दशकांपासून विठ्ठलरावांची योगसाधना बघितल्यावर ही व्यक्ती जनसामान्यांच्या विचारसरणीपासून फार दूर तर ईश्वराला अभिप्रेत असलेल्या नरनारायण सेवेच्या अतिशय निकट असल्याचे जाणवते. आज त्यांनी नव्वदावी पूर्ण करून शतकीय वाटचाल सुरू केली आहे.
भंडारा जिल्ह्यातील एका खेडेगावी त्यांचा जन्म झाला. शालेय जीवनापासूनच त्यांना योगसाधनेची आवड निर्माण झाली. ग्रंथ हेच गुरू मानून अत्यंत सेवाभावी वृत्तीने योगक्षेत्रात कार्य सुरू केले. डॉ. जीभकाटे यांनी आपली योगसाधना वयाच्या २६ व्या वर्षी सुरू केली. १९६१ साली त्यांचे गुरु परमपूज्य श्री ११०८ शंकराचार्य योगेश्वरानंदतीर्थ स्वामीजी महाराज यांच्याकडून त्यांना अनुज्ञा प्राप्त झाली. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ नागपूरचे संस्थापक परमपूज्य जनार्दन स्वामीजी यांच्या सहवासात ते योगसाधना व योगप्रसाराचे कार्य करीत आहे.
त्यांनी आज वयाची ९० वर्षे पूर्ण केली असताना देखील तरुणांना लाजवेल असे या क्षेत्रात त्यांचे कार्य चालू आहे. त्यांच्या या योगक्षेत्रातील कार्याच्या अनुषंगाने अनेक थोर व्यक्तींचा सहवास लाभला. अधिकारी, कर्मचारी, मजूर, प्राध्यापक, विद्यार्थी, महिला, रुग्ण या सर्वासाठी ते नि:शुल्क सेवाभावी वृत्तीनं मार्गदर्शन करीत आहेत. डॉ. विठ्ठलराव जीभकाटे यांची योगावर आतापर्यंत ३५ पुस्तके प्रकाशित झाली आहे. पाच हजारावर त्यांनी नि:शुल्क शिबिर घेतली आहे. १९९७ साली साऊथ कोरियातील सेऊल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा परिषदेत भारतीय चमूसोबत असलेल्या प्रतिनिधी मंडळामध्ये विठ्ठलराव होेते. आकाशवाणीवरून योगप्रसारासाठी व्याख्याने त्यांनी दिली. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांच्या प्रबंधाला पीएच.डी. मिळाली. त्याचबरोबर योगाचार्य, योगमहर्षी, योगपंडित असे किताब आणि अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. योगप्रसारकांना आर्थिक मदत, पारितोषिक वितरण ते करीत असतात.