मानसोपचाराच्या नावाखाली डझनभर महिला-मुलींचा लैंगिक छळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:15 IST2025-01-15T13:14:27+5:302025-01-15T13:15:09+5:30
आरोपीला अटक : पीडितांचा आकडा वाढण्याची शक्यता

Dozens of women and girls sexually harassed in the name of psychotherapy
नागपूर : शहरातील एका तथाकथित मानसोपचारतज्ज्ञ समुपदेशकाकडून डझनाहून अधिक महिला-मुलींची लैंगिक छळवणूक केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. महिन्याभराअगोदर या प्रकरणात पहिली तक्रार समोर आली होती व त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्या चौकशीतून १५ महिला-मुलींच्या लैंगिक छळवणुकीची बाब समोर आली असली, तरी हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण असून, पोलिसांनी हे प्रकरण गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला असून, अधिकारीदेखील बोलण्याचे टाळत आहेत.
संबंधित आरोपी समुपदेशक म्हणून विविध जागी शिबिरे घेतो, तसेच तो क्लिनिकदेखील चालवतो. नैराश्यात असलेल्या अनेक महिला-मुली त्याच्याकडे समुपदेशनासाठी येत होत्या. तसेच, तो काही विद्यार्थिनींना मार्गदर्शनदेखील करायचा. रुग्णांच्या मानसिक स्थितीचा फायदा उचलत त्याने अनेकींची छळवणूक केली. त्याने काही विद्यार्थिनी-महिलांचे व्हिडीओदेखील काढले होते व ते दाखवून तो त्यांना ब्लॅकमेल करत होता. महिन्याभराअगोदर यातील एका पीडितेने त्याचा छळ असह्य झाल्याने पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. सध्या तो नागपूर कारागृहात आहे. त्याच्या मोबाइलमध्ये काही क्लिपिंग्ज सापडल्या आहेत. चौकशीदरम्यान त्याने १५ महिला-मुलींना टार्गेट केल्याची बाब समोर आल्याची माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
अनेक विवाहित महिला टार्गेट
आरोपीने विद्यार्थिनींसोबतच अनेक विवाहित महिलांनादेखील टार्गेट केले होते. त्याच्याकडे छायाचित्रे-व्हिडीओ असल्याने सर्वजणी मूग गिळून गप्प बसल्या होत्या. पोलिसांकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे. त्याची पत्नीदेखील एकेकाळी त्याची विद्यार्थिनीच होती. ती या तक्रारीनंतर फरार झाली आहे.
शिबिराच्या बहाण्याने न्यायचा आऊटिंगला
- १ संबंधित आरोपी उपचाराच्या नावाखाली किंवा शिबिराच्या बहाण्याने महिला, तसेच विद्यार्थिनींना आऊटिंगला न्यायचा. तेथे तो त्यांच्यावर जवळीक साधायचा किंवा गुंगीचे औषध देत अत्याचार करायचा. त्याचे तो मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग करायचा. त्यानंतर त्याच्या आधारावर ब्लॅकमेलिंग करायचा.
- अल्पवयीन मुलीवरदेखील त्याने अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात पोलिस अधिकारी काहीही बोलायला तयार नाहीत.