डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 21:03 IST2025-08-28T21:02:50+5:302025-08-28T21:03:26+5:30
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारा गवळी मागील १८ वर्षांपासून जामिनासाठी प्रयत्न करत होता. त्याचा जामीन मंजूर झाला असला तरी गुरुवारी त्याची सुटका झाली नाही. शुक्रवारीदेखील त्याची सुटका होण्याची शक्यता कमीच दिसून येत आहे.
जामसांडेकर यांची घाटकोपर येथे त्यांच्या निवासस्थानी भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात १८ वर्षानंतर अरुण गवळी याला जामीन मंजूर करण्यात आल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्यासंदर्भातील अटी-शर्ती सत्र न्यायालय निश्चित करेल असे स्पष्ट केले होते. त्यामुळे मुंबई सत्र न्यायालयातून अटी-शर्ती निश्चित झाल्यावर जामिनासंदर्भात ऑर्डर जारी होईल. त्याची प्रत नागपूर मध्यवर्ती कारागृहात आल्यानंतरच गवळीची सुटका होईल. ही प्रक्रिया शुक्रवारी झाल्यास शनिवारी किंवा सोमवारी गवळीची सुटका होऊ शकते, असा कयास कारागृहातील सूत्रांनी वर्तविला आहे.