निरोगी समाजासाठी डॉक्टरांनी जनजागृती करावी - राज्यपाल देवव्रत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 08:43 IST2026-02-27T08:40:21+5:302026-02-27T08:43:44+5:30
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज; 'लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थ केअर अवॉर्ड'चे दिमाखदार सोहळ्यात वितरण

निरोगी समाजासाठी डॉक्टरांनी जनजागृती करावी - राज्यपाल देवव्रत
नागपूर : दया, करुणा आणि सहिष्णु भावाने कार्य करत रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांचे समाजावर मोठे उपकार आहेत. निरोगी समाजासाठी शुद्ध हवा, पाणी व मातीची गरज आहे. त्यासाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व समाजघटकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. निसर्गाच्या जवळ जाणे हे निरोगी समाजाचे लक्षण असून निसर्गापासून लांब जाणे हे रोगी समाजाचे लक्षण आहे. समाजात वेगाने वाढत असलेल्या रोगांच्या पार्श्वभूमीवर निरोगी समाज घडविण्यासाठी डॉक्टरांनी जनजागृती करावी, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.
आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर्सना राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते 'लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थ केअर अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले.
नागपुरातील सेंटर पॉइंट हॉटेल येथे गुरुवारी आयोजित या सोहळ्याला राज्यपालांच्या सुविद्य पत्नी दर्शनादेवी, आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा, 'नीरी'चे संचालक डॉ. एस. व्यंकटमोहन, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, ज्यूरी बोर्डाचे अध्यक्ष डॉ. जय देशमुख, सचिव डॉ. राजू खंडेलवाल, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, 'एम्स'चे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी, 'लोकमत'चे संचालक अशोक जैन, 'लोकमत टाइम्स'चे संपादक एन. के. नायक आदी मान्यवर उपस्थित होते.
चुकीच्या खानपान सवयींवर डॉक्टरांनी मार्गदर्शन करावे
भारतीय संस्कृतीचा आधार असणाऱ्या वेदांमध्ये दुसऱ्यांप्रती सहवेदना भाव व्यक्त करणाऱ्या मानवतेला प्राधान्य दिले आहे. हाच मानवतेचा भाव वैद्यकीय क्षेत्रात दिसून येतो. पौष्टिक अन्न सर्वांना मिळाले पाहिजे. मात्र चुकीच्या खानपान सवयींमुळे रोगांचे प्रमाण वाढत आहे. डॉक्टरांनी यावरही सर्वांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. पौष्टिक व कसदार अन्नधान्य निर्मितीसाठी नैसर्गिक शेती काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.
'लोकमत'च्या वाटचालीचा गौरव
स्वातंत्र्यलढा सुरू असताना १९१८ मध्ये 'लोकमत' वृत्तपत्र सुरू झाले. राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय वृत्तपत्र ठरलेल्या 'लोकमत'चे लोकशाहीच्या स्थापनेत मोठे योगदान आहे. 'लोकमत' हे निष्पक्ष पत्रकारितेचे एक मोठे माध्यम बनले आहे. आपत्ती निवारण, शिक्षण, आरोग्य यांसारख्या विविध क्षेत्रांत 'लोकमत' जनकल्याणासाठी काम करीत आहे, अशा शब्दांत राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी 'लोकमत'च्या वाटचालीचा गौरव केला.
वैद्यकीय क्षेत्रातील मान्यतांसाठी सिंगल विंडो प्रणाली हवी, वैद्यकीय तज्ज्ञांचा बराचसा वेळ वाचेल : डॉ. विजय दर्डा
वैद्यकीय तज्ज्ञाला एखादे रुग्णालय उघडायचे असेल तर मोठी पायपीट करावी लागते. विविध ना-हरकत प्रमाणपत्रे घ्यावी लागतात. पर्यावरण मान्यता, अग्निशमन मान्यता यांसारख्या विविध परवानग्यांची आवश्यकता असते. त्यात वैद्यकीय तज्ज्ञांचा बराचसा वेळ जातो. या प्रक्रियेला गती देण्याची गरज आहे. त्यामुळे उद्योगक्षेत्राप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रासाठी विविध मान्यतांसाठीही सिंगल विंडो प्रणालीची आवश्यकता आहे, असे मत 'लोकमत'च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी व्यक्त केले.
लहान मुलांकडे शाळेत स्मार्टफोन असतात. त्यातून अनेक वाईट गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतात. अनेक मुले त्यामुळे भरकटतात आणि वाईट मार्गालादेखील लागण्याचा धोका असतो. यासंबंधातील नियामक प्राधिकरणांनी शाळकरी विद्यार्थ्यांच्या मोबाइल वापरावर बंदी आणायला हवी. ऑस्ट्रेलियात याबाबतीत पाऊल उचलण्यात आले आहे, असे प्रतिपादन डॉ. दर्डा यांनी केले.
रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न हवेत : प्रकाश आबिटकर
गरजेपेक्षा जास्त वाढणारे रुग्ण ही काळजीची बाब आहे. डॉक्टरांनी रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
आज वैद्यकीय क्षेत्रातील स्पर्धेसोबतच अर्थकारणदेखील वाढले असून, त्यामुळे सामान्य व्यक्ती अस्वस्थ होत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील सेवा की व्यवसाय ह तफावत कमी झाली पाहिजे. व्यवसाय करायलाच हवा, मात्र डॉक्टरांनी सेवाभावाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आबिटकर यांनी व्यक्त केली.
लोकांना बिल किती येईल याची भीती वाटते. सामान्य माणसाला परवडणाऱ्या अशा उत्कृष्ट वैद्यकीय सेवा डॉक्टरांनी दिल्या पाहिजेत. राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे. यात महात्मा फुले आरोग्यदायी योजना व आयुष्मान भारत योजना एकत्रित करून २ हजार ३९९ आजारांवर मोफत उपचार होतील. ९ ते १४ वयोगटांतील मुलींसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती आबिटकर यांनी यावेळी दिली.
३० हून अधिक वयोगटातील लोकांची कर्करोगाबाबतीची तपासणीदेखील सुरू करण्यात येणार आहे. रुग्णालयांनाही अडचणी येतात. त्यासाठी सरकार म्हणून आम्ही भूमिका घेतली पाहिजे. बॉम्बे नर्सिंग अॅक्टमध्ये वन विंडो प्रणाली करून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. फायर सेफ्टी, पर्यावरणाशी संबंधित परवानगीची किचकट प्रक्रिया दूर करून ती सुटसुटीत करण्यावर भर राहणार असल्याचे ते म्हणाले.