गरिबांची सेवा हेच डॉक्टरांचे समाधान : राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 09:38 PM2020-01-27T21:38:34+5:302020-01-27T21:44:10+5:30

गरीब, दु:खितांचे दु:खहरण हेच डॉक्टरांचे समाधान असते व तोच सर्वात मोठा पुरस्कार असतो, असे मत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

Doctor's satisfaction is the service of the poor: Governor | गरिबांची सेवा हेच डॉक्टरांचे समाधान : राज्यपाल

गरिबांची सेवा हेच डॉक्टरांचे समाधान : राज्यपाल

googlenewsNext
ठळक मुद्दे‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्-२०२०’चे थाटात वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नाते विश्वासाचे असून, या श्रद्धेला तडा जाऊ नये. पण समाजातील काही डॉक्टर्स रुग्णांकडून अवाजवी शुल्क घेतात, अशी अनेकदा ओरड होताना दिसते. परंतु अत्याधुनिक तंत्र व यंत्र यासाठी त्यांनादेखील खर्च करावाच लागतो. त्यामुळे डॉक्टरांनी पैसे कमविणे यात गैर काहीच नाही. असे करीत असताना त्यांनी सामाजिक भान जपत समाजातील गरीब रुग्णांनादेखील मदत केली पाहिजे. गरीब, दु:खितांचे दु:खहरण हेच डॉक्टरांचे समाधान असते व तोच सर्वात मोठा पुरस्कार असतो, असे मत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्-२०२०’चे सोमवारी नागपुरात थाटात वितरण झाले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. ‘मेडिसीन’ आणि ‘हेल्थकेअर’ क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारे डॉक्टर्स आणि मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 


स्थानिक ‘हॉटेल सेंटर पॉईंट’ येथे झालेल्या समारंभाला वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी महासंचालक व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि पुणे येथील संचेती हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष व मुख्यऑर्थोपेडिक सर्जन डॉ. के.एच. संचेती प्रमुख अतिथी आणि मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी अतिथी म्हणून ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, ‘एसबीएस बायोटेक’, चंदीगडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव जुनेजा उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर ‘लोकमत’च्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, पुरस्कार निर्णायक मंडळाचे अध्यक्ष डॉ.एस.एन.देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. 

आधुनिक काळात वैद्यकीय क्षेत्रात दररोज नवनवे शोध लागत आहेत. भविष्याचा वेध घेऊन डॉक्टरांनी तर चंद्रावर कशाप्रकारे उपचार होतील, याबाबत विचार केला पाहिजे. डॉक्टरांना अनेक पुरस्कार मिळतात. परंतु गरिबांच्या सेवेतून मिळणारी आत्मिक शांती हा सर्वात मोठा पुरस्कार असतो. डॉक्टरांनी ग्रामीण भागाचीदेखील चिंता केली पाहिजे, असे राज्यपाल म्हणाले. नागपूरच्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी भूमीतून डॉक्टरांनी संकल्प घ्यावा व गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेत एक नवा इतिहास रचावा. डॉक्टर या विचारांवर चालले तर खऱ्या अर्थाने हे पुरस्कारदेखील इतिहास घडविणारे ठरतील, असे प्रतिपादनही राज्यपालांनी यावेळी केले. या समारंभाचे संचालन श्वेता शेलगांवकर यांनी तर पुरस्कार निर्णायक मंडळाचे सचिव डॉ.राजू खंडेलवाल यांनी आभार मानले.

दर्डा हे खरोखर ‘विजयस्तंभ’च
यावेळी राज्यपालांनी विजय दर्डा यांच्याबाबत कौतुकोद्गार काढले. विजय दर्डा माझ्यासोबत राज्यसभेत होते. त्यांनी सर्वच क्षेत्रात जीवाभावाची माणसे जोडली आहेत. त्यांचा करिष्मा सगळीकडेच दिसून येतो. अगदी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातदेखील ‘लोकमत’च दिसून येतो. खरोखर दर्डा हे ‘विजयस्तंभ’च आहेत. त्यांच्याशी माझे जिव्हाळ्याचे संबंध असून, त्यांचा शब्द माझ्यासाठी जणू आदेशच असतो. त्यांच्या पुढाकारातून सुरू झालेले ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्’ नवा इतिहास रचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरकारी इस्पितळांची योग्य देखभाल व्हावी : दर्डा

यावेळी विजय दर्डा यांनी पुरस्कारांमागची भूमिका मांडली. मध्य भारतातील ‘मेडिकल हब’ म्हणून नागपूरची ओळख निर्माण झाली आहे. शहराला हे स्थान मिळवून देण्यात येथील डॉक्टरांचा मोलाचा वाटा आहे व त्यांचा सन्मान व्हायलाच पाहिजे, या भावनेतून पुरस्कारांची कल्पना समोर आली. आरोग्य क्षेत्रात अद्यापही बरेच कार्य करणे बाकी आहे. गावांमध्ये अनेक समस्या आहेत. सरकारी इस्पितळांची अवस्था वाईट असून, जागोजागी अस्वच्छता व असुविधा दिसून येते. यंत्र असतात पण चालत नाहीत. आजारांचे माहेरघरच झाल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे या इस्पितळांच्या देखभालीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हे काम काढून इतर संस्थेला दिले पाहिजे. यासाठी राज्यपालांनी सरकारला निर्देश द्यावे, असे विजय दर्डा म्हणाले.

पारदर्शक पुरस्कार : एस.एन.देशमुख
‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्-२०२०’चे विजेते निवडणे हे पुरस्कार निर्णायक मंडळासमोर मोठे आव्हानच होते. या प्रक्रियेत संपूर्णत: पारदर्शकता ठेवण्यात आली होती. ५० टक्के गुण निर्णायक मंडळ व ५० टक्के गुण जनतेच्या मतांवर आधारित होते व त्यानुसार विजेते निवडण्यात आले, असे पुरस्कार निर्णायक मंडळाचे अध्यक्ष डॉ.एस.एन.देशमुख यांनी सांगितले.


‘लाईफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड्स’

डॉ.बी.जे.सुभेदार, नागपूर
डॉ.शोभा ग्रोव्हर, नागपूर

‘आऊटस्टॅन्डिंग कॉन्ट्रिब्युशन पुरस्कार’

डॉ.सुधीर बाभुळकर, नागपूर
डॉ.मदन कापरे, नागपूर
डॉ.श्रीकांत मुकेवार, नागपूर
डॉ.जय देशमुख, नागपूर
डॉ.देबाशिष चॅटर्जी, गोंदिया

पुरस्कार श्रेणी              डॉक्टर
मेडिसिन व संबंधित        डॉ.अशोक बावस्कर, खामगाव
सर्जरी व संबंधित            डॉ.चंद्रशेखर बांडे ,नागपूर
प्रसूती व स्त्रीरोग             डॉ.स्नेहा भुयार, यवतमाळ
नेत्ररोग                           डॉ.जुगल चिरानिया, अकोला
बालरोग                         डॉ.नरेंद्र राठी, अकोला
सुपर स्पेशलिटी (मेडिसीन) डॉ.प्रमोद मुंदडा, नागपूर
सुपर स्पेशलिटी (सर्जरी) डॉ.क्षितिज पाटील, अमरावती
फॅमिली फिजिशियन डॉ.अशोक वासलवार, चंद्रपूर
रेडिओलॉजी/ पॅथालॉजी डॉ.सुधीर नेरळ, नागपूर
रुग्णालय (हॉस्पिटल) ओझोन हॉस्पिटल, अकोला

Web Title: Doctor's satisfaction is the service of the poor: Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.