बाहेर न पडता घरीच साधना करा; अ.भा. सकल जैन समाजाचे श्रावकांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 03:31 IST2020-08-14T03:31:10+5:302020-08-14T03:31:17+5:30
स्थानके उघडण्यास परवानगी मिळाली तर भाविकांना रोखणे शक्य होणार नाही, अशी भावना यावेळी सर्वांनीच व्यक्त केली.

बाहेर न पडता घरीच साधना करा; अ.भा. सकल जैन समाजाचे श्रावकांना आवाहन
नागपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जैन संप्रदायाच्या श्रावक-श्राविकांनी कुठेही बाहेर न पडता घरीच आराधना करावी, असे आवाहन अ.भा. सकल जैैन समाजाचे अध्यक्ष विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या तातडीच्या डिजिटल बैठकीत करण्यात आले आहे. स्थानके उघडण्यास परवानगी मिळाली तर भाविकांना रोखणे शक्य होणार नाही, अशी भावना यावेळी सर्वांनीच व्यक्त केली.
चातुर्मासानिमित्त जैन मंदिरे व स्थानके उघडण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी जैन समाजाच्या काही बांधवांतर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, कोरोनाची सध्याची स्थिती आणि वातावरण पाहू जाता अशी परवानगी देता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर समाजाची तातडीची बैठक होऊन उपरोक्त निर्णय घेण्यात आला. जैन समाज हा अनुशासनप्रिय आहे. अहिंसा, क्षमा, अनुशासन या भगवान महावीरांनी घालून दिलेल्या तत्त्वांचे हा समाज तंतोतंत पालन करतो. कोरोना संसर्ग जसजसा वाढतो आहे, त्या अनुषंगाने सरकारनेही जनतेसाठी काही नियम तयार केले आहेत. जैन समाजाने कोर्टाच्या निर्णयासोबतच सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांचेही स्वागत केले आहे. एरव्ही चातुर्मासासाठी जैन साधू, संत, साध्वी देशात पायी भ्रमण करीत असतात पण यावेळी ते नियमांच्या अधीन राहून कुठेही पायी गेलेले नाहीत. आहे तेथूनच ते जप, तप, साधना करीत आहेत. एवढेच नव्हेतर समाजाच्या सर्व श्रावक, श्राविकांनी आपल्या घरूनच साधना करावी, असे आवाहनही गुरुमहाराजांनी समस्त जैन बांधवांना केले आहे. या बैठकीला सकल जैन समाजाचे सर्वश्री निखिल कुसुमगर, नरेश पाटणी, संतोष पेंढारी, अनिल पारख, मनीष मेहता, अतुल कोटेचा, दिलीप रांका, उज्ज्वल पगारिया, नितीन खारा, सुरेंद्र लोढा, माधुरी बोरा आदी उपस्थित होते.
पर्वाधिराज पर्युषण पर्व घरीच करा साजरे-विजय दर्डा
सकल जैन समाजाचेपर्वाधिराज पर्युषण पर्व १५ ते ३१ आॅगस्ट या काळात संपन्न होत आहे. यावर्षी देशाच्या अनेक भागात आचार्य तसेच साधू, साध्वींच्या सान्निध्यात सर्व श्रावक-श्राविका सरकारच्या नियमांनुसार जप, तप, उपवास व धर्म आराधना करीत आहेत. समाजाच्या सर्व धार्मिक संस्थांनी यावर्षी पर्युषण पर्व काळात प्रशासनाचे नियम लक्षात ठेवूनच आपल्या परंपरेनुसार धार्मिक आराधना करावी. धार्मिक स्थळावर न जाता आपल्या परिवारासोबत घरीच साधना करावी, असे आवाहन विजय दर्डा यांनी केले आहे. ते म्हणाले, पर्युषण पर्वानंतर आयोजित होणाऱ्या सामूहिक क्षमायाचना, स्वामी वात्सल्य आदी कार्यक्रम यावर्षी कोविड-१९ चे संक्रमण पाहू जाता आयोजित करता कामा नये. विराजमान साधू-साध्वींच्या संयमी जीवनात अधिकाधिक सौहार्दपूर्ण (साता) वातावरण राहील याची काळजी समस्त श्रावकांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.