मोठ्या बँकांद्वारे बनावट नोटांचे वितरण ! नागपूरच्या चलनामध्ये 'फेक करन्सी' फिरत आहे

By योगेश पांडे | Updated: September 10, 2025 19:16 IST2025-09-10T19:14:34+5:302025-09-10T19:16:28+5:30

१५ दिवसांत तीन जणांविरोधात गुन्हे दाखल : थेट 'आरबीआय' कार्यालय व 'एसबीआय' एटीएममध्येच बनावट नोटा

Distribution of fake notes by big banks! 'Fake currency' is circulating in Nagpur's currency | मोठ्या बँकांद्वारे बनावट नोटांचे वितरण ! नागपूरच्या चलनामध्ये 'फेक करन्सी' फिरत आहे

Distribution of fake notes by big banks! 'Fake currency' is circulating in Nagpur's currency

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
सणासुदीच्या तोंडावर उपराजधानीतील चलनात बनावट नोटा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मागील १५ दिवसांतच तीन वेगवेगळ्या प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे तीनही गुन्हे हे बँक किंवा एटीएमच्या माध्यमातून बनावट नोटा चलनात मिळण्याचे प्रयत्न झाले. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे यातील एका प्रकरणाचा खुलासा स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या एटीएममधून झाला, तर दोन गुन्हे थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात आढळलेल्या बनावट नोटांच्या आधारे दाखल झाले.

जर या मोठ्या बँकांमध्येच बनावट नोटा आढळल्या आहेत, तर शहरात इतर चलनात या नोटा किती प्रमाणात फिरविण्यात आल्या आहेत, हा मोठा प्रश्न यंत्रणांसमोर उपस्थित झाला आहे. पहिला मोठा प्रकार कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एसबीआयच्या 'एटीएम'मध्ये समोर आला. 'एसबीआय'च्या कामठीच्या गरूड चौकाजवळील शाखेत ऑटोमॅटिक डिपॉझिट कम विड्रॉवल मशीन आहे. त्यात अनेक जण दररोज मोठ्या प्रमाणावर पैसे डिपॉझिट करतात. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला त्यातील ट्रे भरला व त्यामुळे ती रक्कम काढण्यात आली. मशीनच्या 'रिजेक्टेड बिन'मध्ये ५०० रुपयांच्या ३८ नोटा आढळल्या. त्या नोटांची तपासणी केली असता त्या सर्व बनावट असल्याचे आढळून आले. मशीनजवळ लागलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासणी केली असता कामठीतील बजरंगनगरमधील आकाश रविशंकर यादव याने त्या नोटा जमा केल्या होत्या. तेथील व्यवस्थापक अमोल राऊत यांच्या तक्रारीनुसार यादवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बनावट नोटांना ओळखणे महत्त्वाचे

सणासुदीच्या कालावधीत रोखीद्वारेच अनेकांकडून व्यवहार करण्यात येतात. विशेषतः किराणा सामान, दागिने, कपडे घेताना रोखीवरच भर असतो. गर्दीच्या ठिकाणी बनावट नोटा सहज खपविल्या जातात. बनावट नोटांना वेळीच ओळखून पोलिसांना त्याची माहिती देणे महत्त्वाचे ठरते. बँकांमध्ये नोटा आढळल्यावर तक्रार करण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे व अनेकदा ग्राहकांनादेखील त्यांच्याकडे बनावट नोटा कुठून आल्या याची कल्पना नसते. या वेळखाऊ प्रक्रियेत यामागील खरे आरोपी सहज निसटून जातात.

'आरबीआय'मधील 'बॉक्स'मध्येदेखील बनावट नोटा

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयातील 'बॉक्स'मध्येदेखील बनावट नोटा आढळल्याचा प्रकार समोर आला. संबंधित नोटा फेब्रुवारी व मे महिन्यात बॉक्समध्ये टाकण्यात आल्या होत्या, संबंधित टीएलआर बॉक्समध्ये जुन्या व फाटक्या नोटा बदलून मिळतात. त्यासाठी ग्राहकांना त्यांचे आधार कार्ड, बँकेचे तपशील द्यावे लागतात. या बॉक्समध्ये फेब्रुवारी महिन्यात १०० रुपयांच्या ११ बनावट नोटा आढळल्या. त्या प्रकरणात सहायक व्यवस्थापिका भैरवी खरतड यांच्या तक्रारीवरून भूषण दिलीप पाटील (वय ३५, चितोड मार्ग, धुळे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर मे महिन्यात पाच बनावट नोटा आढळल्या. त्या नोटा निहारिका नावाच्या तरुणीने बॉक्समध्ये टाकल्या होत्या. तिला बँकेत बोलविण्यात आले. मात्र, तिच्याकडून काहीच प्रतिसाद न आल्याने खरतड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट नोटा आढळल्यावर प्राथमिक तपासणीनंतरच बँकाकडून तक्रार करण्यात येते. हे दोन्ही गुन्हे याच आठवड्यात दाखल झाले आहेत.

Web Title: Distribution of fake notes by big banks! 'Fake currency' is circulating in Nagpur's currency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.