Dig up the road and construct the cement road: Vikas Thakre conducted the survey | रस्ता खोदून सिमेंट रोडचे बांधकाम करा  : विकास ठाकरे यांनी केली पाहणी

रस्ता खोदून सिमेंट रोडचे बांधकाम करा  : विकास ठाकरे यांनी केली पाहणी

ठळक मुद्देगोधनी- टाकळी रस्त्याला गती द्या

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : गोधनी- टाकळी सिमेंट रस्त्याचे थांबलेले काम त्वरित सुरू करा. सिमेंट रोडच्या उंचीमुळे दुकानांमध्ये तसेच वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी साचण्याची शक्यता विचारात घेता पुढील काम करताना आधी एक फूट रस्ता खोदा व नंतर त्यावर सिमेंट रोडचे बांधकाम करा, अशी सूचना आ.विकास ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. रस्त्याच्या बांधकामातील त्रुटीमुळे नागरिकांना त्रास झाला तर आंदोलन केले जाईल, असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला.
आ. विकास ठाकरे यांनी गुरुवारी गोधनी- झिंगाबाई टाकळी सिमेंट रोडच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भानुसे, उपअभियंता भोयर, कंत्राटदार उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याचे काम बंद आहे. त्यामुळे रस्त्यावरील धूळ उडून दुकानांमध्ये धुळीचे थर साचले आहेत. वाहने चालविताना नागरिकांना धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. शिवाय सिमेंट रस्ता मूळ रस्त्यापेक्षा सव्वा ते दीड फूट उंच बांधला जात आहे. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा पावसाचे पाणी साचणार आहे. हे पाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये शिरेल व दुकानदारांचे मोठे नुकसान होईल. शिवाय वस्त्यांमध्येही पाणी साचून राहिल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. या बाबतच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
यापुढचा रस्ता एक फूट खोल खोदावा व नंतर त्यावर दीड फूट उंचीचा सिमेंट रस्ता बांधण्यात यावा. संबंधित काम एक ते दीड महिन्यात त्वरित पूर्ण करावे. काम सुरू असेपर्यंत धूळ उडू नये म्हणून त्यावर पाणी मारण्यात यावे. नागरिकांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे समाधान करावे, आदी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी माजी नगरसेवक अरुण डवरे, सुभाष मानमोडे, प्रमोदसिंग ठाकूर, स्वप्निल पातोडे, विलास बरडे, राम कळंबे, राजेश पायतोडे, जगदीश गमे, संजय भिलकर, अमित पाथरे, कृष्णा गावंडे, रवी वऱ्हाडे आदींनी तक्रारी मांडल्या.

नालीचे बांधकाम व्यवस्थित करा
 पाहणी दरम्यान नागरिकांना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या लहान नालीवरच नव्याने नाली बांधण्यात येतअसून तिचा आकार लहान करण्यात आल्याची तक्रार केली. याची दखल घेत संबंधित नालीचे बांधकाम निकषानुसार व गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी दिल्या.

Web Title: Dig up the road and construct the cement road: Vikas Thakre conducted the survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.