तांत्रिक चोरट्यांना केवळ साक्षीच्याच अस्थी हव्या होत्या? उमरेड येथील घटनेने शहरामध्ये भीती; शोधाशोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 19:53 IST2025-11-06T19:52:38+5:302025-11-06T19:53:23+5:30
स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे लावा : पाणी, विद्युत आणि अन्य सुविधा ठेवा

Did the thieves only want Sakshi's bones? The incident in Umred has created fear in the city; Search has begun
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : येथील स्मशानभूमीतून मंगळवारी (दि.४) सकाळी ८ वाजेच्या सुमारास एका तरुणीच्या पार्थिवासह दोन पार्थिवांची 'राख आणि अस्थी' गायब झाली. तंत्रविद्येसाठी अज्ञात तांत्रिकांनी हा किळसवाणा प्रकार केला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी उमरेड पोलिसांनी कंबर कसली असून, पोलिसांची विविध पथके शोधमोहिमेवर रवाना झाली आहेत.
साक्षी सुनील पाटील (२३, रा. बालाजीनगर, उमरेड) आणि नरेश दुर्योधन सेलोटे (४८, रा. परसोडी, उमरेड) अशी मृतांची नावे आहेत. दोन्ही पार्थिवांवर एकाच स्मशानभूमीत काही तासांच्या अंतराने अंत्यसंस्कार पार पडले. दुसऱ्या दिवशी नातेवाईक अस्थी गोळा करण्यासाठी पोहोचले असता, अस्थी चोरीचा प्रकार उजेडात आला.
साक्षी पाटील आणि नरेश सेलोटे यांच्या पार्थिवाला अगदी काही फूट अंतरावरच अग्नी दिला गेला. यामुळे मृत साक्षी हिच्या अस्थी नेमक्या कोणत्या आहेत, याबाबत मांत्रिकांमध्ये संशयकल्लोळ निर्माण झाला असावा, म्हणूनच दोन्ही अस्थी गायब केल्या असाव्यात, असा कयास लावला जात आहे.
सीसीटीव्ही आणि सुविधा
शहरात अंत्यसंस्कारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी तीन स्मशानभूमी उपलब्ध आहेत. एक स्मशानभूमी भिवापूर महामार्गालगत, दुसरी वेकोलि आमनदी राष्ट्रीय महामार्गाजवळ आणि तिसरी स्मशानभूमी ही कुही मार्गावर आमनदीच्या पात्रालगत आहे. या तिन्ही स्मशानभूमींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नाहीत. तसेच या ठिकाणी पाणी, विद्युत, रस्ता आणि अन्य सुविधा याबाबतही गैरसोयी दिसून येतात. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. सीसीटीव्ही लावावे, अशी मागणी केली जात आहे.
राज्यातील चौथी घटना
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील नामपूर येथील स्मशानभूमीतून महिलेच्या अस्थी गायब झाल्याची घटना घडली होती. सुरेखा खैरनार (४०) असे मृत महिलेचे नाव आहे. मे २०२५ मध्ये ही घटना घडली होती. जळगाव जिल्ह्यातील मेहरून आणि शिवाजीनगर या दोन स्मशानभूमींमध्येही असाच प्रकार घडल्याची नोंद आहे. या ठिकाणी राखेतील दागिने चोरण्यासाठी हा प्रकार केला असावा, असे बोलले जात आहे. जळगाव जिल्ह्यातील घटना ऑक्टोबर २०२५ मधील आहे. त्यानंतर आता ४ नोव्हेंबरला उमरेड येथील स्मशानभूमीत दोन पार्थिवांची राख आणि अस्थी गायब झाल्यात. राज्यातील ही चौथी घटना आहे. उमरेड येथील हा प्रकार दागिने चोरीचा नाही, ही बाब स्पष्ट बोलली जात आहे.
"आम्ही या प्रकरणाची सखोल चौफेर चौकशी करीत आहोत. कुणालाही काहीही संशयास्पद दिसून आल्यास पोलिस विभागाला कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल."
- धनाजी जळक, ठाणेदार, उमरेड