धर्मभास्कर प. पू. सद्गुरूदास महाराज यांचे निधन; अध्यात्मिक क्षेत्रावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 20:07 IST2026-02-11T20:04:40+5:302026-02-11T20:07:00+5:30
Nagpur : गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर विवेक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Dharmabhaskar P. Pu. Sadgurudas Maharaj passes away; Mourning on the spiritual field
नागपूर : धर्मभास्कर प. पू. सद्गुरूदास महाराज उपाख्य शिवकथाकार विजयराव देशमुख यांचे सायंकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर विवेक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भक्तगण आणि अनुयायांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
सद्गुरूदास महाराज हे शिवकथाकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित होते. त्यांच्या ओजस्वी वाणीने आणि प्रभावी कथनशैलीने हजारो श्रोत्यांना अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेची प्रेरणा दिली. त्यांनी आपल्या प्रवचनांमधून धर्म, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला.
छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे ते संस्थापक होते. तसेच गुरुमंदिर परिवाराचा ते आधारस्तंभ मानले जात होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. समाजात मूल्याधिष्ठित कार्याची परंपरा त्यांनी जोपासली.