नागपुरात सोमवारी एटीएमने उडवली धम्माल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 21:59 IST2020-09-07T21:54:48+5:302020-09-07T21:59:25+5:30
स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीय बँकेच्या शहरातील एटीएमनी नागरिकांची धम्माल उडविली. बँकेचे सर्व्हर डाऊन असल्याने एटीएममधून कॅश काढण्यास जाणाऱ्या ग्राहकांच्या हातात काहीच येत नव्हते. मात्र, त्या ट्रान्झॅक्शनचे डेबिट बँकेच्या अकाऊंडमधून होत होते. यामुळे, नागरिक भयभीत झाले होते.

नागपुरात सोमवारी एटीएमने उडवली धम्माल!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीय बँकेच्या शहरातील एटीएमनी नागरिकांची धम्माल उडविली. बँकेचे सर्व्हर डाऊन असल्याने एटीएममधून कॅश काढण्यास जाणाऱ्या ग्राहकांच्या हातात काहीच येत नव्हते. मात्र, त्या ट्रान्झॅक्शनचे डेबिट बँकेच्या अकाऊंडमधून होत होते. यामुळे, नागरिक भयभीत झाले होते.
एनी टाईम मनी अर्थात एटीएम, असा सर्वसामान्य अर्थ लावला जातो. मात्र, केव्हाही पैसा पुरवणारी ही बँकेची अधिकृत यंत्रणा बरेचदा नागरिकांची गफल्लत करत असते आणि त्याचा मनस्तापही सहन करावा लागत असतो. असेच चित्र सोमवारी शहरातील एसबीआय बँकेच्या एटीएम यंत्रणेबाबत दिसून येत होते. विशेष म्हणजे, एसबीआयचे एटीएम शहरात सर्वात जास्त संख्येने आहेत आणि कुठेही या बँकेचे एटीएम सहज सापडते. त्यामुळे, कुठल्याही बँकेचे ग्राहक या एसबीआयच्या या यंत्रणेतून पैसा काढण्यास पुढाकार घेत असतात. सोमवारी या बँकेच्या शहरातील बऱ्याच एटीएममध्ये नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. प्रत्येक नागरिक एटीएम कार्ड स्वॅप करताना योग्य तऱ्हेने पिन नंबरही टाकत होते. त्याअनुषंगाने पैसा येण्याची वाट बघितली जात होती. मात्र, कॅश मशीनच्या बाहेरच पडत नव्हती. मात्र, तात्काळ ट्रान्झॅक्शन झाल्याचा एसएमएस मोबाईलवर झळकत होता. बँकेच्या खात्यातून पैसा डेबिट झाला तर गेला कुठे? असा प्रश्न अनेकांच्या चेहऱ्यावर पडला होता. अनेक जण बँकेला शिव्यांची लाखोलीही वाहत होते. या प्रकारामुळे अनेकांनी ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या तत्त्वानुसार उद्या पैसे काढू म्हणत काढता पाय घेतला. ज्यांना एटीएमच्या या प्रकाराची जाणीव होती, ते संबंधित पैसा डेबिट झालेल्या ग्राहकांना दिलासा देत पैसा खात्यात नक्की परत येईल, असा दिलासाही देत होते. मात्र, ज्यांच्यासोबतच असला प्रकार प्रथमच झाला, त्यांचे धाबे दणाणले होते.