"निष्ठेने काम करूनही गद्दारीचा शिक्का ! मग पक्षात राहायचे कशाला?" काँग्रेसच्या दोन गटातील शीतयुद्ध टोकाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 13:32 IST2025-09-20T13:31:16+5:302025-09-20T13:32:47+5:30
Nagpur : प्रा. पुरके-देशमुख यांच्या एकाच दिवशी वेगळ्या सभा

"Despite working loyally, it is a mark of betrayal! Then why stay in the party?" The cold war between the two factions of Congress is at its peak.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : मागील काही महिन्यांपासून कळंब तालुक्यात काँग्रेसच्या दोन गटांत चांगलेच शीतयुद्ध रंगले आहे. दोन्ही गटांनी मागील आठवड्यात एकाच दिवशी स्वतंत्र बैठका घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. काँग्रेसमधील प्रवीण देशमुख गटाने राष्ट्रवादीची कास धरण्याचा निर्णय पक्का केला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील दोन गटांतील शीतयुद्धाला पक्षांतरानंतर पूर्णविराम मिळणार आहे.
प्रा. वसंत पुरके यांनी शहरातील एका आश्रमशाळेवर त्यांच्या गटातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. तत्पूर्वी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रवीण देशमुख गटाने काँग्रेस पक्षाच्या विरोधात काम केल्याची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे केली. त्यामुळे या बैठकीत गद्दारीचा विषय चांगलाच गाजला. अपवाद वगळता बहुतांश कार्यकर्त्यांनी एकनिष्ठेने काँग्रेस पक्षाचे काम केले. असे असले तरी जबाबदार व्यक्तीने पक्षविरोधी काम केले का? त्याचा कोणाकडे पुरावा आहे का? पुरावा असेल तर तो सादर करावा. पुरावा नसेल तर वैयक्तिक हेवेदाव्यासाठी काँग्रेस पक्षाचे नुकसान करू नये, असे मत या बैठकीत प्रा. पुरके यांच्या समक्ष काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
विधानसभेतील पराभव हा नियोजनाचा अभाव व 'रसद' पुरवठा न झाल्याने ओढवलेला आहे. याला कार्यकर्ते नाही तर नेते जबाबदार आहेत, असेही मत मांडण्यात आले. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या कार्यशैलीवर काहींनी रोष व्यक्त केला. तसेच अध्यक्ष बदलण्याची मागणीही लावून धरली. प्रवीण देशमुख गट काँग्रेस पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळे प्रा. पुरके हे आपल्या कार्यकर्त्याची बैठक घेऊन काँग्रेसमधील मंडळींना पक्षांतरापासून थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बैठक घेण्यात आल्याची माहिती आहे. प्रवीण देशमुख यांनी कळंब येथे घेतलेल्या बैठकीत निष्ठेने काम करूनही गद्दारीचा शिक्का बसत असेल, तर काँग्रेसमध्ये राहायचे कशाला? असा सवाल केला.
भाजप प्रवेशाची घोषणा करूनही मुहूर्त नाही
घाटंजीतील काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने पत्रपरिषदेत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जाहीर घोषणा केली. मात्र या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अजूनही निघालेला नाही. त्या पदाधिकाऱ्याला गावपातळीपासून नागपूर, मुंबईपर्यंत येरझारा माराव्या लागत आहे. यामुळे पक्षप्रवेश जाहीररित्या होणार की मुंबईतच प्रवेश होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आल्याने पक्षांतर वाढले आहे.
बाजार समितीत आज महत्त्वपूर्ण बैठक
कळंब बाजार समितीमध्ये शनिवार, २० सप्टेंबर रोजी काँगेसमधील नाराज मंडळींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीमध्येच काँग्रेस पक्ष सोडण्यावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे समजते.