देशमुखांनी फडणविसांविरोधात लढण्याचा निर्णय पक्षावर सोडला
By कमलेश वानखेडे | Updated: August 26, 2024 16:55 IST2024-08-26T16:54:29+5:302024-08-26T16:55:25+5:30
वडेट्टीवार म्हणतात राष्ट्रवादीने दावा केला तर चर्चा करू : धर्मरावबाबांचे देशमुखांना आव्हान

Deshmukh left the decision to fight against Fadnavis to the party
नागपूर : उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय कलगितुरा रंगला आहे. अशातच फडणवीस यांच्या विरोधात देशमुख हे निवडणूक लढवतील, अशा चर्चांनी जोर धरला आहे. मात्र, माझ्या पक्षात मी एकटा निर्णय घेत नसतो. पक्ष ठरवेल त्या पद्धतीने होईल, असे स्पष्ट करीत देशमुख यांनी याबाबतचा निर्णय आता पक्षावर सोडला आहे.
फडणवीस हे आधी पश्चिम नागपुरातून व मतदारसंघ पुनर्रचनेनंतर दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून सातत्याने विजयी होत आहे. फडणवीसांना पराभूत करणे तर दूर पण तगडी टक्कर देण्यातही काँग्रेस सातत्याने अपयशी ठरली आहे. १०० कोटी रुपये वसुलीच्या आरोपांवरून अनिल देशमुख यांना तुरुंगवारी झाली. जामिनावर बाहेर आल्यापासून देशमुख हे सातत्याने फडणवीस यांच्यावर नेम साधत आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत देशमुख हे फडणवीस यांना दक्षिण- पश्चिम नागपूर मतदारसंघात आव्हान देतील का, अशी चर्चा राजकीय वतुर्ळात रंगू लागली आहे. याबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले, फडणवणीस विरुद्ध अनिल देशमुख यांनी लढण्यासंदर्भात अद्याप कुठलिही चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादीने त्या जागेवर दावा केला तर चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अनिल देशमुख यांनी माझ्या विरोधात अहेरीतून लढावे. मला पक्षाने सांगितले तर मी त्यांच्या विरोधात लढण्यास तयार असल्याचे सांगत आव्हान दिले आहे. देशमुख हे फडणवीस यांच्या विरोधात लढले देशमुखांचे डिपॉझिट जप्त होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.