उपवनसंरक्षक दीपक भट गजाआड
By Admin | Updated: June 1, 2015 04:00 IST2015-06-01T04:00:52+5:302015-06-01T04:00:52+5:30
वनविभागाचे उपवनसंरक्षक दीपक मनोहर भट (५६) यांच्याविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा दाखल करून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रविवारी अटक केली

उपवनसंरक्षक दीपक भट गजाआड
नागपूर : वनविभागाचे उपवनसंरक्षक दीपक मनोहर भट (५६) यांच्याविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा दाखल करून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रविवारी अटक केली. म्हाडा कॉम्प्लेक्सजवळच्या बसस्थानकावर भट यांना ताब्यात घेउन एसीबीने शुक्रवारी रात्री त्यांच्याकडून १९ लाख २५ हजार रुपये जप्त केले होते.
वन विभागातील वनरक्षक व वनपालांच्या बदल्यात मोठा गैरव्यवहार झाल्याची ओरड होती. मोठमोठ्या रकमा घेऊन बदल्या करण्यात आल्याचाही आरोप होता. एसीबीचे पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्याकडे आलेल्या तक्रारीच्या आधारे भट यांच्यावर नजर ठेवण्यात आली. शुक्रवारी २९ मेच्या रात्री ते मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन पुण्याला जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर एसीबीच्या पथकाने शुक्रवारी रात्री ८.३० वाजता १९ लाखांच्या रोकडसह त्यांना ताब्यात घेण्यात आले़ ही रक्कम आपल्या सासऱ्याकडून मुलाच्या शिक्षणासाठी आणल्याचे त्यांनी सांगितले. कधी ही रक्कम कशी आली ते आठवत नसल्याचे भट सांगत होते. पुण्याला अत्यंत महत्त्वाचे काम आहे, ते आटोपण्यासाठी आपले जाणे गरजेचे आहे, तिकडून आल्यानंतर पाहिजे ती चौकशी करा, असे भट यांनी सांगितले होते. त्यांच्याकडून ठोस माहिती मिळाली नसली तरी ठोस पुरावे नसल्यामुळे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी भट यांना त्यावेळी पुण्याला जाण्याची मुभा दिली. मात्र, सोमवारपर्यंत परत चौकशीसाठी येण्याची ताकिदही दिली. (प्रतिनिधी)