समाज कल्याण उपायुक्त बाबासाहेब देशमुख निलंबित, कृषी अवजारे पुरवठ्यात बचतगटांची फसवणूक केल्याचा ठपका
By आनंद डेकाटे | Updated: May 5, 2025 23:02 IST2025-05-05T23:01:17+5:302025-05-05T23:02:03+5:30
Nagpur News: कृषी अवजारे पुरवठा करताना बचत गटांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत समाज कल्याण विभागाचे उपायुक्त बाबासाहेब देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सहसचिव सोमनाथ बागुल यांच्या स्वाक्षरीने सोमवारी शासन आदेश जारी करण्यात आले.

समाज कल्याण उपायुक्त बाबासाहेब देशमुख निलंबित, कृषी अवजारे पुरवठ्यात बचतगटांची फसवणूक केल्याचा ठपका
- आनंद डेकाटे
नागपूर - कृषी अवजारे पुरवठा करताना बचत गटांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत समाज कल्याण विभागाचे उपायुक्त बाबासाहेब देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सहसचिव सोमनाथ बागुल यांच्या स्वाक्षरीने सोमवारी शासन आदेश जारी करण्यात आले.
समाजकल्याण विभागाने २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील १०० महिला बचत गटांना कृषी अवजारे देण्याची योजना आखली. प्रत्येक महिला बचत गटाला ८ लाख ७१ हजारांचे साहित्य देण्यात येणार होते. परंतु उमरेड तालुक्यातील महिला बचत गटांना साहित्य मिळालेच नाही. हे साहित्य ९० टक्के अनुदानावर देण्यात आले. १० टक्के रक्कम भरल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटाच्या खात्यात टाकण्यात आली. समाज कल्याण विभागाकडून करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटाच्या खात्यात आल्यानंतर ती लगेच काढण्यात आल्याचे दिसून आले. पुरवठादाराकडून काही साहित्य बचत गटांना देण्यात आले. परंतु ते नादुरुस्त असल्याचे कारण पुढे करीत परत नेले. १० टक्के रक्कम त्रयस्थ व्यक्तीकडून भरण्यात आल्याची बाबही तपासात समोर आली.
काही महिला बचत गटांचे प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचे समोर आले. काही प्रमाणपत्रांवर एक-दोन वर्षांपूर्वीची तारीख होती. त्यामुळे बचत गट बोगस तयार करण्यात आल्याची शंका व्यक्त केली जात आहे. संपूर्ण जिल्ह्यातच हा प्रकार झाल्याचा अंदाज आहे. प्राथमिक चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला होता. त्यांच्याकडून यावर चौकशी समिती गठित करण्यात आली. ही योजना राबविण्यात आली त्यावेळी बाबासाहेब देशमुख सहाय्यक आयुक्त होते. ही योजना राबविण्यात महिला बचत गटाची फसवणूक झाल्याचा ठपका ठेवत देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
खासदार बर्वे यांनी केली होती पीएमओकडे तक्रार
या प्रकरणात खासदार श्यामकुमार बर्वे यांनी पीएमओकडे तक्रार केली होती. पीएमओकडून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. समाज कल्याण मंत्री संजय शिरसाठ यांनीही याबाबत मुंबईत बैठक घेतली होती.
डाॅ. सिद्धार्थ गायकवाड यांच्याकडे प्रभार
चंद्रपूर जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त डाॅ. सिद्धार्थ गायकवाड यांच्याकडे उपायुक्त पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला. गायकवाड हे यापूर्वी जवळपास पाच वर्ष या पदावर कार्यरत होते.