पाच लाखांच्या खंडणीची मागणी : नागपुरातील बजाजनगरात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:21 IST2019-05-11T00:19:38+5:302019-05-11T00:21:23+5:30
एका तरुणाला मारहाण करून तलवारीच्या धाकावर जीवे मारण्याची धमकी देऊन चौघांनी त्याला पाच लाखांची खंडणी मागितली. २६ एप्रिलच्या दुपारी घडलेल्या या गुन्ह्याची बजाजनगर ठाण्यात तब्बल दोन आठवड्यानंतर नोंद करण्यात आली. या प्रकारामुळे गुन्हेगारी वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

पाच लाखांच्या खंडणीची मागणी : नागपुरातील बजाजनगरात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका तरुणाला मारहाण करून तलवारीच्या धाकावर जीवे मारण्याची धमकी देऊन चौघांनी त्याला पाच लाखांची खंडणी मागितली. २६ एप्रिलच्या दुपारी घडलेल्या या गुन्ह्याची बजाजनगर ठाण्यात तब्बल दोन आठवड्यानंतर नोंद करण्यात आली. या प्रकारामुळे गुन्हेगारी वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
राजा जमशेद शरीफ (वय २८) असे तक्रार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो अनंतनगरातील अहबाब कॉलनीत (गिट्टीखदान) राहतो. त्याने पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, २६ एप्रिलला दुपारी १ वाजता आरोपी आशिष सोनोने आणि तपन जयस्वाल या दोघांनी बजाजनगर बास्केटबॉलच्या ग्राऊंडजवळ बोलविले. तेथे सोनोने आणि जयस्वालने राजाला पाच लाख आणले का, असे विचारले. कशाचे पाच लाख, असा राजाने प्रश्न केला असता मागे उभा असलेल्या एका आरोपीने त्याला मानेवर थापड मारली तर, दुसऱ्या एका आरोपीने कंबरेत जोरदार लाथ मारली. आरोपी सोनोने तलवार आणतो, असे म्हणत त्याच्या लाल रंगाच्या कारजवळ धावत गेला. तुझे तुकडे तुकडे करतो, अशी धमकीही दिली. प्रसंगावधान राखत राजा पळून गेला. दरम्यान, त्याने बऱ्याच विलंबाने दिलेल्या तक्रारीवरून बजाजनगरचे ठाणेदार राघवेंद्र क्षीरसागर यांनी सोनोने, जयस्वाल आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवून घेतला. आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
क्रिकेट सट्ट्याची रक्कम?
आरोपी तपन जयस्वाल हा मद्यविक्रेता असून, तो क्रिकेट सट्ट्याच्या बेटिंगमध्येही सक्रिय असल्याचे पोलीस सांगतात. त्याचे कुख्यात बुकी राजसोबत घनिष्ठ संबंध आहे. राजा नेमका काय करतो, याची माहिती पोलिसांकडे नाही. मात्र, सोनोने आणि जयस्वालमुळे ही रक्कम क्रिकेट सट्ट्यातील उधारीची असावी, असा पोलिसांचा संशय आहे. आयपीएलदरम्यान बुकी आणि सटोड्यांमध्ये क्रिकेट सट्ट्याच्या लगवाडी-खायवाडीच्या रकमेचा वाद दरवर्षीच उफाळून येतो. त्यातून अनेकांचे भांडण होतात. वसुलीसाठी अपहरण करण्याचे, धमकावण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. हा त्यातीलच प्रकार असावा, असा पोलिसांचा संशय असून, राजचे काही कनेक्शन आहे का, त्याचाही पोलीस तपास करीत आहेत.