पतीला धोका.. खान्देशात नवरा सोडून तिने राजस्थानात केला दुसरा घरठाव
By नरेश डोंगरे | Updated: March 29, 2024 21:01 IST2024-03-29T20:59:48+5:302024-03-29T21:01:08+5:30
जीवापाड प्रेम करणाऱ्या पतीसोबत धोकेबाजी : नवऱ्यासोबत पोलीसही चक्रावले

पतीला धोका.. खान्देशात नवरा सोडून तिने राजस्थानात केला दुसरा घरठाव
नरेश डोंगरे
नागपूर : खांदेशातून माहेरी जाण्यासाठी निघालेली पत्नी बेपत्ता झाल्याने जिवापाड प्रेम करणारा नवरा कावराबावरा झाला. तिचे अपहरण झाल्याची तक्रार करून तिला शोधून काढावे म्हणून त्याने पोलिसांमागे तगादाच लावला. पोलिसांनीही प्रकरण गांभिर्याने घेत या घटनेमागची पार्श्वभूमी शोधली. दरम्यान, तपासात पुढे आलेल्या घटनाक्रमामुळे तिचा नवराच नव्हे तर तपास करणारे पोलीसही चाट पडले. जिचे अपहरण झाल्याचा संशय होता, ती बया जीव लावणाऱ्या नवऱ्याला धोका देऊन राजस्थानमध्ये पळून गेली अन् तेथे तिने दुसरा घरठाव केल्याचे उघड झाले.
प्रकरण असे आहे, गोंदियातील सुनैनाचे (वय २२, नाव काल्पनिक) चार वर्षांपूर्वी जळगावमधील जगनसोबत (वय २३, नाव काल्पनिक) लग्न झाले. तीन साडेतीन वर्षांचा कालावधी गोडीगुलाबीने गेला. त्यांना दोन वर्षांची मुलगीही आहे. जगनचे सुनैनावर जीवापाड प्रेम. बायकोचे शक्य तेवढे लाड तो पुरवित होता. १४ मार्चला माहेरी जातो म्हणून मुलीला घेऊन ती गोंदियाकडे निघाली. जगनने पत्नी आणि मुलीला ट्रेनमध्ये बसवून दिले. नागपूर स्थानकावर पोहचल्यानंतर तिने जगनला फोन केला. दोन ते तीन तासानंतर गोंदियाला पोहचल्यानंतर फोन करतो, असेही सांगितले. त्यामुळे तीन चार तासानंतर जगन तिच्या फोनची वाट बघू लागला. तिचा फोन आला नसल्याने स्वत:च वारंवार तिला फोन करू लागला. ती 'आऊट ऑफ रेंज' असल्याची वारंवार कॅसेट वाजत असल्याने त्याने सासरी फोन करून विचारणा केली. मात्र, २४ तास होऊनही ती गोंदियाला पोहचलीच नव्हती. त्यामुळे जगन सैरभैर झाला. नागपूर रेल्वे स्थानक गाठून त्याने पत्नी आणि तिच्या सोबत असलेल्या दोन वर्षीय चिमुकलीचे अपहरण झाल्याची तक्रार रेल्वे पोलिसांकडे नोंदवली. ठाणेदार मनिषा काशिद यांनी तातडीने तपास सुरू केला. रेल्वे स्थानकावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सुनैना रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर तिच्याजवळ दोन तरुण आले अन् ती त्यांच्यासोबत दुसऱ्या एका गाडीत बसून रवाना झाल्याचे फुटेजमध्ये दिसत होते. या फुटेजवरून तिचे अपहरण झाल्यासारखे वाटत नव्हते. ती स्वत:च त्यांच्यासोबत जात असल्याचे पोलीस जगनला सांगत होते. मात्र, बायकोवरील प्रेमापोटी 'ती तशी नाही' तिला काही तरी खाऊ घालून त्या तरुणांनी सोबत नेल्याचे जगन सांगत होता. तिला तातडीने शोधून काढा, असा हेकाही त्याने धरला होता.
दीड-दोन महिन्यात सहाशेवर कॉल्स
प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी सुनैनाच्या फोनचा सीडीआर काढला. एकाच नंबरवर सुनैनाचे दीड-दोन महिन्यात सहाशेवर कॉल्स झाल्याचे आणि तो नंबर राजस्थानमधील असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जीआरपीच्या ठाणेदार काशिद यांनी दोन दिवसांपूर्वी एक पथक राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात रवाना केले. तेथे आज खानापूरला सुनैना हाती लागली. मात्र, तिने पळून जाऊन अविवाहित तरुणासोबत दुसरे लग्न केल्याचेही स्पष्ट झाले.
म्हणे, नवरा खूप चांगला. मात्र परत जायचे नाही !
पोलिसांनी तिला दुसऱ्या घरठावाचे कारण विचारले. यावर तिचे काहीसे विचित्र उत्तर मिळाले. जगन (नवरा) खूप चांगला, खूप काळजीही घेतो. मात्र, त्याच्याकडे परत जायचे नाही. नव्या नवऱ्यासोबत दोन महिन्यांपूर्वी ओळख झाली, फोन नंबर एक्सचेंज केले अन् आता घरठाव केला, असेही तिने पोलिसांना सांगितल्याचे समजते. तिच्या या पवित्र्यामुळे आता काय करावे, असा प्रश्न रेल्वे पोलिसांना पडला आहे.