‘डान्स क्लासेस’साठी नागपुरात प्रशिक्षकांनी केले नृत्य; संविधान चौकात अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 20:38 IST2020-08-21T20:37:38+5:302020-08-21T20:38:00+5:30
नागपुरातील संविधान चौकात नृत्यदिग्दर्शक, नृत्यगुरू, प्रशिक्षणार्थी व संबंधित कलावंतांनी नृत्य करून आगळेवेगळे आंदोलन करीत आपल्या मागण्या शासनदरबारी मांडल्या.

‘डान्स क्लासेस’साठी नागपुरात प्रशिक्षकांनी केले नृत्य; संविधान चौकात अनोखे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्ग आणि त्यामुळे लागू झालेल्या टाळेबंदीने कलाक्षेत्र तर पूर्णत: उद्ध्वस्त झाल्याच्या स्थितीत आहे. नागपुरातील संविधान चौकात नृत्यदिग्दर्शक, नृत्यगुरू, प्रशिक्षणार्थी व संबंधित कलावंतांनी नृत्य करून आगळेवेगळे आंदोलन करीत आपल्या मागण्या शासनदरबारी मांडल्या.
राज्यात व शहरात मोठ्या संख्येने डान्स क्लासेस चालतात. मात्र, संसर्गाच्या भीतीपोटी खबरदारी म्हणून मार्चपासून टाळेबंदी लागू झाली आणि इतर क्षेत्राप्रमाणे कलाक्षेत्रावरही निर्बंध आले. या पाच महिन्यात डान्स क्लासेसवर उपजीविका चालविणाऱ्या प्रशिक्षकांवर आर्थिक अडचण ओढवली. शिवाय, कुठलेच कार्यक्रम नसल्याने अशा जाहीर कार्यक्रमातून होणारे अर्थोत्पादनही थांबले. त्याचा परिणाम कसेतरी आपल्या पायावर उभे होणारे हे युवा दिग्दर्शक, प्रशिक्षक बेरोजगार झाले. आता टाळेबंदी शिथिल झाली असून, जवळपास मार्केट सुरू झाले आहे. मात्र, अजूनही डान्स क्लासेस सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. ही परवानगी मिळावी आणि पुन्हा एकदा तनामनात नृत्याचा शिरकाव व्हावा, या मागणीसाठी राज्यभरात नृत्यप्रशिक्षकांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. नागपुरात संविधान चौकात ‘एलिट डान्सर्स अँड कोरियोग्राफर्स असोसिएशन (एडका)’तर्फे नर्तकांनी आंदोलन केले. आंदोलन करताना फिजिकल डिस्टन्सिंग जपत डान्सद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
परवानगीच नाही तर जगायचे कसे - लकी तांदूळकर
गेले पाच महिने कमालीची अस्वस्थता निर्माण करणारे ठरले. या काळात आमचा रोजगार तर हिरावलाच, अनेकांच्या घरात चुली पेटतील की नाही अशी स्थिती होती. डान्स क्लासेसला परवानगी दिली तर आम्ही आमची हक्काची मेहनत करून आमची स्थिती सुधारू, अशी भावना ‘एलिट डान्सर्स अँड कोरियोग्राफर्स असोसिएशन (एडका)’चे उपाध्यक्ष लकी तांदूळकर यांनी व्यक्त केली.