हिवाळी अधिवेशनावरील संकट टळले ! २३ कोटी रुपये देण्याचे आश्वासनानंतर ठेकेदारांनी घेतले आंदोलन मागे
By आनंद डेकाटे | Updated: November 22, 2025 19:24 IST2025-11-22T19:22:21+5:302025-11-22T19:24:42+5:30
प्रधान सचिवांच्या आश्वासनानंतर ठेकेदार काम करण्यास तयार : सोमवारी आणखी २३ कोटी रूपये मिळणार

Crisis over winter session averted! Contractors withdraw agitation after assurance of Rs 23 crore
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ठेकेदारांच्या कामबंद आंदोलनामुळे हिवाळी अधिवेशनावर निर्माण झालेले संकट शनिवारी दूर झाले. प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी मध्यस्ती करीत सोमवारी आणखी २३ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठेकेदारांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. रविवारीपासून अधिवेशनाच्या तयारीची कामे युद्धस्तरावर सुरू होणार आहेत.
८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी १ डिसेंबरची डेडलाइन ठरवण्यात आली आहे. २८ नोव्हेंबरपासून नागपूरमध्ये विधानमंडळ सचिवालय कार्यरत होणार आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे ९३.८४ कोटी रुपयांच्या निविदा मंजूर करून कामांना प्रारंभ केला होता.
मात्र, २०२४ च्या अधिवेशनातील सुमारे १५० कोटींच्या थकबाकीची मागणी करत ठेकेदारांनी या महिन्याच्या सुरुवातीला अधिवेशन तयारीच्या कामांचा बहिष्कार केला होता. काही रक्कम मिळाल्याच्या आश्वासनावर काम पुन्हा सुरू केले, परंतु गुरुवारी केवळ २० कोटी रुपये वितरित झाल्याने ठेकेदार नाराज झाले व शुक्रवारी पुन्हा कामबंद केले. दोन दिवस कामकाज ठप्प राहिल्याने अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
दरम्यान पीडब्ल्यूडीच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी शनिवारी नागपुरात येऊन मध्यस्ती केली. त्यांना मुख्य अभियंता संभाजी माने व अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे यांनी परिस्थितीची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी स्पष्ट आश्वासन दिले की सोमवारी ठेकेदारांसाठी २३ कोटी रुपये अतिरिक्त देण्यात येतील. तसेच अधिवेशनापूर्वी थकबाकीची ५० टक्के रक्कम अदा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. अधिकाऱ्यांनी ही माहिती नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुबोध सरोदे यांना दिली. आश्वासन स्वीकारत असोसिएशनने रविवारीपासून काम पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. काही ठेकेदारांनी शनिवारीच काम सुरू केले.
युद्धस्तरावर काम करू
ठेकेदारांनी आश्वासनाचा मान राखण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवस कामबंद झाले असले तरी आता दिवस-रात्र युद्धस्तरावर काम केले जाईल. अधिवेशनापूर्वी थकबाकीची ५० टक्के रक्कम मिळेल, अशी अपेक्षा आहे.
सुबोध सरोदे, अध्यक्ष कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन
ही कामे ठरली मोठी आव्हाने
- हैदराबाद हाऊसच्या बॅरेकचे छत उघडे पडले आहे. १ डिसेंबरपूर्वी ते दुरुस्त करून सुस्थितीत करणे आवश्यक.
- रविभवनातील चार कॉटेजच्या छताचे काम सुरू असून येथे नवीन छत बांधले जात आहे.
- विधान भवनात मंत्र्यांच्या दालनाचे काम अद्याप अपूर्ण आहे.
- वन विभाग चौक ते बोर्ड ऑफिस चौक या दरम्यानचा सिमेंट रस्ता सुमारे ५० टक्के अपूर्ण आहे.
डेडलाइनपूर्वी काम पूर्ण करू
१ डिसेंबरपूर्वी बहुतेक कामे पूर्ण होतील. बहुतांश कामे अंतिम टप्प्यात असून ठेकेदार रविवारीपासून कामाला सुरुवात करतील. त्यामुळे डेडलाईनपूर्वीच काम पूर्ण करू.
- जनार्दन भानुसे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग