अगोदर कारला धडक, नंतर विद्यार्थ्याला बेदम मारहाण; गुन्हेगाराचा भर रस्त्यावर राडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 10:33 AM2023-01-24T10:33:26+5:302023-01-24T10:35:15+5:30

धरमपेठेतील घटना; आरोपी ताब्यात

Criminals hustle the streets of Nagpur, First hit the car then brutally beaten a student | अगोदर कारला धडक, नंतर विद्यार्थ्याला बेदम मारहाण; गुन्हेगाराचा भर रस्त्यावर राडा 

अगोदर कारला धडक, नंतर विद्यार्थ्याला बेदम मारहाण; गुन्हेगाराचा भर रस्त्यावर राडा 

Next

नागपूर : भर रस्त्यावर कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढले असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आरोपी पोलिस यंत्रणेला आव्हान देताना दिसून येतात. अशीच एक घटना धरमपेठेतील व्हीआयपी मार्गावर दिवसाढवळ्या घडली. एका गुन्हेगाराने अगोदर एका विद्यार्थ्याच्या कारला धडक दिली व त्यानंतर जाब विचारला म्हणून त्याला बेदम मारहाण केली. निखिल हेमराज हिरणवार (२३, रा. गवळीपुरा, धरमपेठ) असे आरोपीचे नाव असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रथम सारडा हा विद्यार्थी दुपारी चारच्या सुमारास आपल्या कारने मित्राला भेटण्यासाठी भोले पेट्रोल पंप चौकातून ट्रॅफिक पार्कच्या दिशेने चालला होता. वाटेत तो कोल्ड्रिंक घेण्यासाठी थांबला. त्याने कार रस्त्याच्या कडेला उभी केली व तो दुकानात गेला. यावेळी निखिल हिरणवार हा मागून आला व त्याने धडक देत प्रथमच्या कारचा आरसा तोडला. ते पाहून प्रथमने त्याला आवाज देऊन थांबविले. हे पाहून निखिल संतापला व त्याने येऊन थेट प्रथमला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

यादरम्यान, निखिलचे तीन नातेवाईकदेखील मागून आले व त्यांनी प्रथमला आणखी मारले. यावेळी घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी मध्यस्थी करून प्रथमला त्यांच्या तावडीतून सोडविले. प्रथमचे मित्रदेखील तेथे पोहोचले व ते त्याला इस्पितळात घेऊन गेले. यानंतर प्रथमने सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी निखिलविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. लखन हिरणवार, नीलेश हिरणवार व आणखी एका नातेवाईकावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिलवर यापूर्वीही प्राणघातक हल्ला आणि इतर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Criminals hustle the streets of Nagpur, First hit the car then brutally beaten a student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.