Crime News : व्यापाऱ्यावर झालेल्या गोळीबार-लुटीच्या प्रकरणात चार आरोपी अटकेत; प्रत्यक्ष हल्ला करणारे फरारच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 12:57 IST2025-09-17T12:57:00+5:302025-09-17T12:57:38+5:30
Nagpur : सुपारी देऊन हल्ला करण्यासाठी उत्तर प्रदेशातून बोलावले

Crime News : Four accused arrested in shooting and robbery case against businessman; actual attackers absconding
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कडबी चौकाजवळ एका व्यापाऱ्यावर गोळीबार करून ५० लाख रुपये लुटण्यात आल्याच्या घटनेत पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे. परंतु प्रत्यक्ष हल्ला करणारे आरोपी अद्यापही फरार आहेत. त्यांना सुपारी देऊन हल्ला करण्यासाठी उत्तर प्रदेशातून बोलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांकडून अतिशय गुप्तता बाळगण्यात येत आहे.
राजू दीपानी (जरीपटका) असे जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे. ते व्यापारी असून, गुजरातमधील एका कंपनीसाठीदेखील डेटा फिडिंगचे काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे दहा नंबर पुलाजवळ कार्यालय आहे. रात्री ८ वाजताच्या सुमारास ते कार्यालयातून निघाले व चौकातून आतील भागात शिरले. तेथे बाबा नावाच्या व्यक्तीच्या घरासमोरून ते दुचाकीने जात असताना दुचाकीवरून दोन आरोपी आले व त्यांनी दीपानी यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातात स्प्रे पाहून दीपानी यांनी धोका ओळखून तेथून निघण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांच्यावर पिस्तुलाने तीन गोळ्या झाडल्या.
यामुळे दीपानी खाली पडले. त्यांच्याजवळील पैशांची बॅग घेऊन आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी दीपानी यांच्या कार्यालयातील लोकांची सखोल चौकशी केली व त्यातून लिंक मिळाली. त्याच्या आधारावर पोलिसांनी सिमरजितसिंग संतासिंग संधू (४२, श्री मुकसर साहेब, पंजाब), शेख हुसैन उर्फ जावेद शेख बशीर सवारे (३७, खरबी उमरेड मार्ग), सय्यद जिशान उर्फ सय्यद रहमान (३२, जाफरनगर) व अब्दुल नावेद अब्दुल जावेद (३३, सेंट्रल एव्हेन्यू) यांना ताब्यात घेतले.
सिमरजितसिंह, बशीर व नावेद हे वाहनांच्या विक्रीचे व्यवहार करतात. नावेदने दीपानी यांच्यासोबत व्यवहार केला होता व त्याला त्यांच्याकडे खूप रोकड असते याची माहिती होती. त्याने सिमरजितसिंगला हे सांगितले. त्याने उत्तर प्रदेशातील सहा गुंडांना लुटीची सुपारी दिली. आरोपी हल्ल्याच्या दोन दिवसांपूर्वी नागपुरात आले. त्यांनी शहरातून दोन दुचाकी चोरल्या व त्यांचा वापर करत दीपानी यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर आरोपी वाडीच्या दिशेने फरार झाले, तर चौघे आरोपी आरोपी नांदेडच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांकडून कमालीची गुप्तता
या प्रकरणात कारवाईनंतर पोलिसांकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे. परंतु एका वरिष्ठ अधिकाऱ्याने चार जणांना अटक झाल्याच्या वृत्ताला नाव न छापण्याच्या अटीवर दुजोरा दिला.