बोगस शिक्षक भरतीवर गदा! आता नियुक्तीचे सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड अनिवार्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 19:54 IST2025-07-25T19:53:32+5:302025-07-25T19:54:10+5:30
Nagpur : शालार्थ आयडीची कागदपत्रे ३० ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अपलोड करणे बंधनकारक

Crackdown on bogus teacher recruitment! Now all appointment documents must be uploaded online
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :नागपूर विभागातील बोगस शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळा गाजत असतानाच आता सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे नियुक्तीपत्र, रुजू अहवाल, मान्यता आदेश, शालार्थ आयडी आदेश आणि इतर संबंधित कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य करण्यात आल्याने बोगस शिक्षक भरती करणाऱ्या संस्थांचे धाबे दणाणले आहे.
बोगस भरतीला आळा घालण्यासाठी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. आदेशानुसार ७ जुलै २०२५ नंतर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे दस्तऐवज विभागीय शिक्षण उपसंचालक वा मंडळाच्या अध्यक्षांमार्फत पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. तसेच, सन २०१२ ते २०२५ या कालावधीत ज्यांना शालार्थ आयडी देण्यात आली आहे, अशा सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचेही कागदपत्रे ३० ऑगस्ट २०२५ पूर्वी पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या शाळा व्यवस्थापनांवर तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा या आदेशात देण्यात आला आहे. 'शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णायक टप्पा आहे. शाळांनी ३० ऑगस्टपूर्वी ही कार्यवाही पूर्ण करावी, अन्यथा शिक्षण विभाग गंभीर दखल घेईल,' असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर, माजी आमदार नागो गाणार यांनीदेखील सर्व शाळांना त्वरित आणि पारदर्शक पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याबाबत पत्र पाठविले आहे.
त्या शिक्षकांनाही कागदपत्रे अपलोड करावी लागणार
शालार्थ आयडी घोटाळ्यात नागपूर जिल्ह्यातील ६२० शिक्षकांची बोगस नियुक्ती करण्यात आल्याचे पुढे आले होते. या शिक्षकांनाही शालार्थ आयडीचे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहेत. या शिक्षकांच्या कागदपत्र पडताळणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.