एचआयव्ही व्हायरल लोड यंत्रावर कोविड तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 10:29 AM2020-06-05T10:29:28+5:302020-06-05T10:29:50+5:30

‘एचआयव्ही’बाधिताच्या रक्तातील विषाणूंची संख्या मोजण्यासाठी असलेल्या ‘व्हायरल लोड’ यंत्रावर कोविड चाचणी करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजीव मुखर्जी यांनी दिले आहेत. यामुळे येत्या काळात चाचणीचा वेग वाढणार आहे.

Covid test on HIV viral load device | एचआयव्ही व्हायरल लोड यंत्रावर कोविड तपासणी

एचआयव्ही व्हायरल लोड यंत्रावर कोविड तपासणी

googlenewsNext
ठळक मुद्दे राज्यात पाच ठिकाणी यंत्र, चाचण्यांचा वेग वाढेल

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘एचआयव्ही’बाधिताच्या रक्तातील विषाणूंची संख्या मोजण्यासाठी असलेल्या ‘व्हायरल लोड’ यंत्रावर कोविड चाचणी करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजीव मुखर्जी यांनी दिले आहेत. यामुळे येत्या काळात चाचणीचा वेग वाढणार आहे. विशेष म्हणजे, एकट्या नागपूरच्या मेडिकलमध्ये रोजच्या चाचण्यांची क्षमता ७५० वर जाणार आहे. राज्यात केवळ नागपूरसह पुणे, मुंबई, धुळे व औरंगबाद या पाचच ठिकाणी हे यंत्र उपलब्ध आहे.
‘अँटी रिट्रोव्हायरल थेरपी’चा प्रतिरोध (रेजिस्टंट) होणाऱ्या ‘एचआयव्ही’बाधितांच्या रक्तातील ‘सीडी फोर’ मोजले जाते. मात्र रक्तातील विषाणूंची संख्या मोजण्यासाठी राज्यातील रुग्णांना मुंबई गाठावी लागायची. दरम्यानच्या काळात बाधितांचे नमुने पुण्याला पाठविले जायचे. परंतु अहवाल यायला उशीर होत असल्याने ‘व्हायरल लोड’ उपकरण उपलब्ध करून देण्यासाठी काही वर्षांपूर्वी ‘नॅशनल एड्स कंट्रोल सेंटर’कडे (नॅको) प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यांच्याकडून निधी उपलब्ध होताच गेल्या वर्षी हे उपकरण मेडिकलला उपलब्ध झाले. या उपकरणावर कोविडची चाचणी शक्य आहे. राज्यात कोविड रुग्णांचे तातडीने निदान होऊन त्यांना उपचाराखाली आणण्यााठी पाचही रुग्णालयांना यावर चाचणी करण्याचा सूचना डॉ. मुखर्जी यांनी दिल्या आहेत. यामुळे चाचण्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

दिवसाला ४५० चाचण्या शक्य
मेडिकलमधील ‘आरटी पीसीआर’ यंत्राची क्षमता वाढून ३०० वर नेण्यात आली आहे. ‘व्हायरल लोड’ यंत्रावर चाचणी करण्यासाठी साधारण १० हजार किट्स मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून उपलब्ध झाल्या आहेत. नव्या यंत्रावर चाचणीला सुरूवात झाली असून रोज ४५०वर कोविडच्या चाचण्या करणे शक्य झाले आहे.

७८८४ चाचण्यांमधून २८६ पॉझिटिव्ह
मेडिकलमध्ये आरटी पीसीआर यंत्रावर ९ एप्रिलपासून, तर ‘व्हायरल लोड’ यंत्रावर ३१ मेपासून कोविड चाचणीला सुरूवात झाली. आतापर्यंत ७,८८४ चाचण्या दोन्ही यंत्रांवर झाल्या आहेत.
यातील २८६ नवी पॉझिटिव्ह प्रकरणे व ८२ जुनी पॉझिटिव्ह प्रकरणे समोर आली आहेत. तर ७,४२५ निगेटिव्ह नमुने आले आहेत. नागपुरात पाच ठिकाणी कोविड चाचणी होत असल्याने मेडिकलमध्ये रोज २०० वर चाचण्या होत आहेत.

‘व्हायरल लोड’वरील चाचणी अधिक अचूक
नागपूरच्या मेडिकलमधील राज्य विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (एसव्हीआरडीएल) ‘आरटी पीसीआर’ या यंत्राद्वारे कोविड चाचणी केली जाते. तातडीच्या चाचणीसाठी ‘सीबी नॅट’ या यंत्राचा वापरही केला जात आहे. आता यात ‘एचआयव्ही व्हायरलॉजी ओव्हरलोड लॅब’ची मदत घेतली जात आहे. ‘आरटी पीसीआर’च्या तुलनेत ‘व्हायरल लोड’ यंत्रावरील कोविड चाचणी अधिक अचूक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

मेडिकलच्या ‘एसव्हीआरडीएल’ची क्षमता ७५०
वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजीव मुखर्जी यांच्या सूचनेनुसार ‘व्हायरल लोड’वर कोविड चाचणीला सुरुवात केली आहे. यामुळे मेडिकलच्या ‘एसव्हीआरडीएल’ रोजची क्षमता वाढून ७५० वर गेली आहे. विदर्भात सर्वाधिक चाचण्या आता मेडिकलमध्ये होणे शक्य आहे.
-डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल
 

Web Title: Covid test on HIV viral load device

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.