१८८ वर्षांचा वटवृक्ष वाचवण्यासाठी न्यायालय सजग ; मनपाला जबाबदारी नक्की करायला आदेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 18:59 IST2025-08-14T18:58:46+5:302025-08-14T18:59:37+5:30

विकासाला नाही विरोध, पण वटवृक्ष जगलाच पाहिजे! : हायकोर्टाचा स्पष्ट संदेश

Court vigilant to save 188-year-old banyan tree; orders Municipal Corporation to take responsibility! | १८८ वर्षांचा वटवृक्ष वाचवण्यासाठी न्यायालय सजग ; मनपाला जबाबदारी नक्की करायला आदेश!

Court vigilant to save 188-year-old banyan tree; orders Municipal Corporation to take responsibility!

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
पाचपावली येथील ठक्करग्राम ई-लायब्ररीच्या परिसरामधील १८८ वर्षे जुन्या वटवृक्षाला दुसऱ्या ठिकाणी जगवण्यासाठी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे यासंदर्भात जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी स्पष्ट करून ही जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्याची राहील, असा प्रश्न महानगरपालिकेला विचारला. तसेच, यावर एक आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.


संवर्धन शहरातील वृक्षांचे करण्यासाठी प्रीती पटेल, कुणाल तांबुळकर, दिनेश शिंदे व यश नेटके या जागृत नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली आहे. विविध विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी अनेक वृक्ष गरज नसताना तोडली जाऊ शकतात, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, मनपाने स्ट्रक्चरल इंजिनीअरच्या अहवालानुसार ई-लायब्ररी इमारतीच्या सुरक्षेकरिता वटवृक्ष स्थानांतरित करणे आवश्यक आहे, असा दावा केला. तसेच, पर्यावरणतज्ज्ञाने वटवृक्ष स्थानांतरित करणे शक्य असल्याचा अभिप्राय दिला आहे, याकडे लक्ष वेधले. त्यामुळे न्यायालयाने मनपाला संबंधित प्रतिज्ञापत्र मागितले. प्रतिज्ञापत्रात जबाबदार अधिकाऱ्याचे नाव व पदाची माहिती द्यावी आणि त्या अधिकाऱ्याची स्वाक्षरीही घ्यावी, असे सांगितले. 


वटवृक्षाचे महत्त्व माहिती आहे का ?
एक वटवृक्ष किती ऑक्सिजन देतो, त्याची उपयोगिता किती आहे याची माहिती घ्या, असेही न्यायालय मनपाला म्हणाले. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण वटवृक्ष जगणे आवश्यक आहे, असे आमचे मत आहे. वटवृक्ष जगणे सर्वांच्या फायद्याचे आहे, असेदेखील नमूद केले.

Web Title: Court vigilant to save 188-year-old banyan tree; orders Municipal Corporation to take responsibility!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर