बंटी-बबलीची लग्न समारंभात हातचलाखी; ८ लाखांचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 13:17 IST2021-12-08T13:02:30+5:302021-12-08T13:17:07+5:30
लग्न समारंभात सहभागी झालेल्या बंटी-बबलीने संधी मिळताच पावणेतीन लाखांच्या रोकडसह आठ लाखांचा ऐवज लंपास केला.

बंटी-बबलीची लग्न समारंभात हातचलाखी; ८ लाखांचा मुद्देमाल लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संगीत समारोहात कुटुंब व्यस्त असल्याची संधी साधून पाहुणे म्हणून सामील झालेल्या बंटी-बबलीने वधूच्या खोलीत ठेवलेली बॅग लंपास केली. या बॅगमध्ये पावणेतीन लाखांच्या रोकडसह आठ लाखांचे दागिने होते. ही घटना कळमना रिंग रोडवरील एका लॉनमध्ये सोमवारी रात्री घडली.
भोपाळ (मध्य प्रदेश) येथील इको ग्रीन पार्कमध्ये राहणारे अनिल पुरणचंद जैन (वय ५१) यांच्या मुलीचा विवाह सोहळा यशोधरानगरातील हमलोग लॉनमध्ये आयोजित करण्यात आला होता. सोमवारी रात्री १० च्या सुमारास संगीत संध्या सुरू असताना या समारंभात सहभागी झालेल्या एक तरुण आणि तरुणीने वरवधूच्या रुममध्ये ठेवलेल्या सामानातील एक बॅग चोरून नेली. या बॅगमध्ये २ लाख, ७५ हजारांची रोकड, दोन मोबाईल आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७ लाख, ९७ हजारांचा ऐवज होता. चोरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर लग्नसोहळ्यात एकच खळबळ उडाली.
ती सराईत जोडगोळी
जैन यांनी या धाडसी चोरीच्या घटनेची माहिती यशोधरानगर पोलिसांना कळविली. पोलिसांनी चोरीचा छडा लावण्यासाठी लॉनमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक तरुण-तरुणी ही बॅग चोरताना दिसून आले. ज्या पद्धतीने ते लग्न सोहळ्यात वावरत होते, त्यावरून ही जोडगोळी सराईत असावी, असा अंदाज बांधण्यात आला आहे. हे बंटी-बबली कोण, ते मात्र स्पष्ट झाले नाही. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.