लग्नाच्या वाढदिवशीच दांपत्याने केली आत्महत्या, बाळ होत नसल्याने उचलले टोकाचे पाऊल
By योगेश पांडे | Updated: January 7, 2025 18:32 IST2025-01-07T18:30:51+5:302025-01-07T18:32:00+5:30
मार्टिननगरात खळबळ : व्हिडीओ शेअर करत सांगितले कारण

Couple commits suicide on wedding anniversary, takes extreme step as they cannot have children
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्षाचा पहिलाच आठवडा नागपुरकरांना मोठा धक्का देणारा ठरला आहे. बाळ होत नसल्याने नैराश्यात असलेल्या एका दांपत्याने लग्नाच्या वाढदिवशीच आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी आत्महत्या करण्याअगोदर सोशल माध्यमांवर व्हिडीओ शेअर करत आत्महत्येचे कारण स्पष्ट केले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टिननगरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
जेरील उर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रीप (५४) व ॲनी जेरील मॉनक्रीप (४५) असे आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेरील मॉनक्रीप हे काही वर्षांपूर्वी शेफचे काम करत होते तर त्यांची पत्नी घरकाम करायची. मात्र काही काळापासून ते बेरोजगार होते. त्यांच्यावर कर्जदेखील झाले होते. लग्नाला २५ हून अधिक वर्ष उलटून गेल्यावरदेखील त्यांना बाळ होत नव्हते. त्यामुळे त्यांचा तणाव आणखी वाढला होता. या तणावातूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. सहा जानेवारी रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. दिवसभर ते लोकांसमोर अगदी सहजपणे वावरत होते. मात्र त्यांच्या मनातील वादळाची कुणालाही कल्पना आली नाही. त्यांनी नातेवाईकांच्या शुभेच्छांचादेखील स्वीकार केला. मध्यरात्रीनंतर त्यांनी गळफास घेत जीवनयात्रा संपविली. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंतदेखील त्यांचा दरवाजा बंदच होता. त्यामुळे शेजारील महिलेने त्यांना आवाज दिला. आतून काहीच प्रतिसाद येत नसल्याने तिने खिडकीतून पाहिले असता दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. तिने आरडाओरड करत इतर शेजाऱ्यांना एकत्रित केले. या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.
व्हॉट्सअपवर ठेवले स्टेटस
जेरील व ॲनीने लग्नाच्या पोशाखातच गळफास घेतला. सोमवारी ते दोघेही फिरायला गेले होते व डिनर डेटलादेखील गेले. याअगोदर त्यांनी व्हिडीओ काढला व तो व्हॉट्अपवर स्टेटस म्हणून ठेवला. यात त्यांनी आत्महत्येचे कारण सांगितले व कुटुंबियांची माफीदेखील मागितली. सोबतच त्यांनी सुसाईड नोटदेखील लिहीली होती. परिस्थितीला कंटाळूनच हे पाऊल उचलत असल्याचे त्यात नमूद आहे.
अंत्यविधीसाठी ठेवले पैसे
सुसाईड नोटसह पोलिसांना घरातून स्टॅम्प पेपर आणि ७५ हजार रुपये रोख सापडले. अंत्यविधीसाठी ७५ हजार रुपये घरात ठेवल्याचे या दाम्पत्याने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. आपले राहते घर कुणाला द्यावे याची सुद्धा नोंद त्यांनी स्टॅम्प पेपर वर केली आहे.
प्रेमविवाहाचा दुर्दैवी शेवट
जेरील व ॲनी यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र कर्ज व बाळ होत नसल्याने ते तणावात होते. नातेवाईकांना अनेकदा त्यांची समजूत काढली होती. सर्वच बाजूनी निराश झाल्याने ते गेल्या दोन महिन्यांपासून निराशेच्या गर्तेत गेले. दोन महिन्यांपासून दोघेही आत्महत्येचा विचार करत होते