CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाची धडकी, दिवसभरात १०३६ रुग्ण : २७ रुग्णांचे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 23:32 IST2020-08-14T23:28:59+5:302020-08-14T23:32:08+5:30
जिल्ह्यात दिवसभरात १०३६ नव्या रुग्णांची नोंद झाली तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाची धडकी, दिवसभरात १०३६ रुग्ण : २७ रुग्णांचे बळी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात दिवसभरात १०३६ नव्या रुग्णांची नोंद झाली तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. कोरोनाच्या या वेगाने अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. रुग्णांची एकूण संख्या १२७४५ तर मृतांची संख्या ४४७ वर पोहचली आहे. यात ग्रामीणमधील ३६३४ रुग्ण व ७३ मृत्यू तर शहरातील ९१११ रुग्ण व ३१६ मृत्यू आहेत. उर्वरीत रुग्ण व मृत्यू जिल्ह्याबाहेरील आहेत. कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. यात मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) आठ रुग्णांचा मृत्यू झाला. यात बेलतरोडी येथील ६२ वर्षीय पुरुष, म्हाडा कॉलनी स्मृतीनगर दत्तवाडी येथील ५९ वर्षीय पुरुष, रविनगर येथील ६१वर्षीय महिला, ५० वर्षीय पुरुष, रहाटे हॉस्पिटलजवळील परिसरातील ७२ वर्षीय पुरुष, देवी नगर टेका नाका येथील ४२ वर्षीय पुरुष, पुनापूर पारडी येथील २२ वर्षीय महिला, हिंगणा येथील ८५वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. यात जरीपटका येथील ९० वर्षीय पुरुष, महाभवानी नगर येथील ५२ वर्षीय पुरुष, रामटेके नगर रामेश्वरी येथील ५३ वर्षीय पुरुष, वैशालीनगर कमाल चौक येथील ५०वर्षीय पुरुष, नागसेननगर येथील चंद्रपूर येथील ६७ वर्षीय पुरुष, मध्य प्रदेश येथील ४५ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर माता मंदिर येथील ४९ वर्षीय महिला, हंसापुरी येथील ८७ वर्षीय पुरुष व बजेरिया लोधीपुरा येथील ५८ वर्षीय पुरुष आदींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील बहुसंख्य रुग्णांना श्वसनाचा विकार, निमोनिआ, उच्चरक्तदाब, टाईप टू मधुमेह आदीही आजार होते. उर्वरीत मृतांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
खासगी लॅबमधून ३५४ तर अॅन्टिजन चाचणीत ३९७ रुग्ण बाधित
शासकीय प्रयोगशाळेच्या तुलनेत खासगी प्रयोगशाळा (लॅब) मधून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. आज खासगीमध्ये ३५४ रुग्णांची नोंद झाली. रॅपीड अॅन्टिजन आता मनपाच्या दहाही झोनमध्ये होत असल्याने चाचण्यांची संख्या वाढली आहे. आज या चाचणीतून ३९७ रुग्णांचे निदान झाले. या शिवाय, आरटीपीसीआर चाचणी करीत असलेल्या मेयोच्या प्रयोगशाळेत १४१, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ४८, एम्सच्या प्रयोगशाळेत ५८, नीरीच्या प्रयोगशाळेत सात, माफसूच्या प्रयोगशाळेत ३१ असे एकूण १०३६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात ग्रामीणमधील १६९ तर शहरातील ८६७ रुग्णांचा समावेश आहे. १२३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५६३९ झाली आहे. सध्या २३५६ रुग्ण उपचार घेत आहेत.
वेळेत रुग्ण रुग्णालयात पोहचत नसल्याने वाढले मृत्यू
नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या मृत्यूवर डेथ आॅडिट समितीची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत मेयो, मेडिकल, एम्ससह खासगी हॉस्पिटलचे प्रतिनिधी उपस्थित होते. ३१ जुलै ते आतापर्यंत झालेल्या मृत्यूचे डेथ समरी रिपोर्ट व केस पेपर्स संबंधित रुग्णालयांच्या प्रतिनिधींना घेऊन बोलविण्यात आले होते. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. पातूरकर म्हणाले, रुग्ण रुग्णालयात पोहचण्यात उशीर होत आहे, रुग्ण लवकरात लवकर रुग्णालयात पोहचेल यावर चर्चा झाली. मृत्यूचे प्रमाण कसे कमी करता येईल यावर भर दिला जात आहे, असेही ते म्हणाले. मात्र, सूत्रानुसार, या बैठकीत रुग्ण वेळेत रुग्णालयात न पोहचण्यासाठी शासकीय यंत्रणा योग्य पद्धतीने काम करीत नसल्याचे आरोप, प्रत्यारोप झाल्याचे सांगण्यात येते.
दैनिक संशयित : २१६
बाधित रुग्ण : १२७४५
बरे झालेले : ५६३९
उपचार घेत असलेले रुग्ण : २३५६
मृत्यू : ४४७