CoronaVirus in Nagpur : नागपुरात १७ रुग्ण, दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 00:10 IST2020-06-27T00:09:35+5:302020-06-27T00:10:49+5:30
मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आलेल्या एका महिलेचा तर खासगी हॉस्पिटलमधून पॉझिटिव्ह आलेल्या पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शुक्रवारी दोन मृत्यूची नोंद झाली.

CoronaVirus in Nagpur : नागपुरात १७ रुग्ण, दोघांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आलेल्या एका महिलेचा तर खासगी हॉस्पिटलमधून पॉझिटिव्ह आलेल्या पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शुक्रवारी दोन मृत्यूची नोंद झाली. मागील पाच दिवसात पाच मृत्यू झाले तर या महिन्यात ११ बळी गेले आहेत. मृतांची संख्या वाढत असताना, गेल्या काही दिवसापासून रुग्णसंख्या मंदावली आहे. आज १७ रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या १४०२ वर पोहचली आहे. गोंदिया येथील ६४ वर्षीय पुरुष रुग्णाचे मूत्रपिंड निकामी झाल्याने नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ते डायलिसीसवर होते. याच हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेत त्यांचा नमुना तपासण्यात आला असता, गुरुवारी रात्री त्यांचा अहवाल पॉझटिव्ह आला. ते व्हेंटिलेटरवर होते. रात्री १२.३० वाजताच्या त्याच अवस्थेत मेयोमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. डोबीनगर, मोमीनपुरा येथील ४० वर्षीय महिलेचा घरीच मृत्यू झाल्यानंतर मेयोत आणण्यात आले. कोविड संशयित म्हणून मृताचा नमुना तपासण्यात आला असता पॉझिटिव्ह अहवाल आला. या महिलेला गंभीर स्वरुपाचा मधुमेह असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कडू ले-आऊट, महाल, वाठोड्यात रुग्ण
कामठी येथील मिल्ट्री हॉस्पिटलमधून गुरुवारी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले असताना आज पुन्हा चार रुग्णांची भर पडली. या रुग्णांचे नमुने मेयोमध्ये तपासण्यात आले. या शिवाय, कडू ले-आऊट नारी, भोयीपुरा, मोमीनपुरा, डीप्टी सिग्नल कळमना, महाल व वाठोडा येथे प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. नाईक तलाव-बांगलादेश येथून दोन तर एक रुग्ण टाकळघाट, हिंगणा या ग्रामीण भागातील आहे. एम्सच्या प्रयोगशाळेत चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण सिम्बॉयसिस येथे क्वारंटाईन होते.
२५ रुग्णांना डिस्चार्ज
मेयो, मेडिकल व एम्समधून २५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. यात मेयोमधून ११ रुग्णांचा समावेश आहे. हे रुग्ण चंद्रमणीनगर, नाईक तलाव-बांगलादेश, शांतिनगर, हंसापुरी, अकोला, काटोल येथील आहेत. एम्समधून १२ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात ११ रुग्ण अमरनगर व एक श्रमिकनगर हिंगणा येथील आहे. मेडिकलमधून दोन रुग्णांना सुटी देण्यात आली. हे दोन्ही रुग्ण महाल येथील आहेत. आतापर्यंत १०४५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
नागपुरातील कोरोना स्थिती
संशयित : २३५४
अहवाल प्राप्त : २३५७५
बाधित रुग्ण : १४०२
घरी सोडलेले : १०४५
मृत्यू : २३