नागपूरच्या तुलनेत अमरावती विभागावर कोरोनाचे संकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 12:22 PM2021-02-19T12:22:47+5:302021-02-19T12:24:35+5:30

Nagpur News कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेला घेऊन बेफिकिरी वाढली आहे. त्यातच कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे आणखी भर पडली. परिणामी, नागपूर व अमरावती विभागात रुग्णात वाढ झाली.

The corona crisis on the Amravati division is darker than in Nagpur | नागपूरच्या तुलनेत अमरावती विभागावर कोरोनाचे संकट गडद

नागपूरच्या तुलनेत अमरावती विभागावर कोरोनाचे संकट गडद

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर विभागात ४,५८२, अमरावती विभागात ५,७९७ नवे रुग्ण नागपूरसह वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ व बुलडाण्यात वाढले रुग्ण

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेला घेऊन बेफिकिरी वाढली आहे. त्यातच कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे आणखी भर पडली. परिणामी, नागपूर व अमरावती विभागात रुग्णात वाढ झाली. नागपूरच्या तुलनेत अमरावती विभागात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. १० ते १८ फेब्रुवारीदरम्यान नागपूर विभागात ४,५८२ तर अमरावती विभागात ५,७९७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. धक्कादायक म्हणजे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील कोरोनाची स्थिती स्पष्ट करताना इतर जिल्ह्याच्या तुलनेत विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे सांगून धोक्याची सूचना दिली होती. मागील आठवड्यात याबाबतचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथकाने नागपूर व अमरावतीला भेट देत वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली. त्यानंतर जागे झालेल्या आरोग्य प्रशासनाने प्रतिबंधक कठोर उपाययोजना हाती घेतल्या. परंतु वाढत्या रुग्णसंख्येत दोन्ही विभागात चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, अमरावती विभागातील रुग्ण नागपूर विभागात उपचारासाठी येत असल्याने संसर्ग पसरण्याची अधिक शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

- कोरानाचे असे वाढले रुग्ण

नागपूर विभागातील सहा जिल्हे मिळून १० फेब्रुवारी ४६९, ११ फेब्रुवारी ५७०, १२ फेब्रुवारी ४६७, १३ फेब्रुवारी ५६२, १४ फेब्रुवारी ५७०, १५ फेब्रुवारी ५४१, १६ फेब्रुवारी ६७३ तर १७ फेब्रुवारी ७३० असे एकूण ४,५८२ नवे रुग्ण आढळून आले. अमरावती विभागातील पाच जिल्हे मिळून १० फेब्रुवारी ५४५, ११ फेब्रुवारी ५१७, १२ फेब्रुवारी ६०४, १३ फेब्रुवारी ७२४, १४ फेब्रुवारी ७८६, १५ फेब्रुवारी ७०३, १६ फेब्रुवारी ८६५ तर १७ फेब्रुवारी १०५३ असे एकूण ५,७९७ रुग्णांची नोंद झाली.

-नागपूर विभागातील दोन तर अमरावती विभागातील चार जिल्ह्यांना धोका

मागील सात दिवसात नागपूर विभागातील सहा जिल्ह्यापैकी नागपूर व वर्धा जिल्ह्यात रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. नागपूर जिल्ह्यात ३,७८० तर वर्धा जिल्ह्यात ५०३ रुग्णांची नोंद झाली. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यापैकी चार जिल्ह्यात रुग्ण वाढत आहेत. अमरावती जिल्ह्यात ३,२४७, अकोला जिल्ह्यात ९४४, बुलडाणा जिल्ह्यात ८१४ तर यवतमाळ जिल्ह्यात ६२० आढळून आले आहेत.

 

 

Web Title: The corona crisis on the Amravati division is darker than in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.