मुंबईत जागावाटपासाठी समन्वय समिती, महायुती एकत्रितच लढणार: चंद्रशेखर बावनकुळे
By योगेश पांडे | Updated: December 10, 2025 18:45 IST2025-12-10T18:45:56+5:302025-12-10T18:45:56+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक झाली होती.

मुंबईत जागावाटपासाठी समन्वय समिती, महायुती एकत्रितच लढणार: चंद्रशेखर बावनकुळे
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : आगामी जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुती एकत्रितपणेच लढणार आहे. मुंबईतील जागावाटपासाठी समन्वय समिती गठीत करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री व भाजपचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपुरात बुधवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक झाली होती. जिल्हा पातळीवरील सर्व नेत्यांना स्थानिक स्तरावर महायुतीची बांधणी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर ५ ते १० टक्के जागांवर काही अडचणी येऊ शकतात, मात्र त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे स्वतः बसून अंतिम निर्णय घेतील.
मुंबई महानगरपालिकेसाठी देखील महायुती सज्ज झाली आहे. शिवसेनेने ९० ते १०० जागांची मागणी केली असली तरी, जागावाटपाचा निर्णय तांत्रिक बाबी तपासून घेतला जाईल. यासाठी भाजपचे आणि शिवसेनेचे प्रत्येकी चार पदाधिकारी तसेच महायुतीचे प्रतिनिधी यांची समिती एकत्र बसून चर्चा करेल. जिथे मतभेद होतील, तिथे वरिष्ठ नेते तोडगा काढतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मुंबईच्या महापौरपदाचा निर्णय फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे तिघे मिळून घेतील.
मनभेद नाही, केवळ मतभेद होते
अजित पवार हे महायुतीचाच अविभाज्य भाग असून ते आमच्या सोबतच राहणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागील निवडणुकांमध्ये काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये मतभेद झाले होते, मात्र ते आता पूर्णपणे दूर झाले आहेत. आमच्यात मनभेद नव्हते, केवळ निवडणूकनिहाय मतभेद होते, असे बावनकुळे यांनीस्पष्ट केले.