Nagpur Violence: औरंगजेबाच्या कबरीचा वाद तापला...! नागपूरात २ गटात तणाव; पोलिसांना धक्काबुक्की
By योगेश पांडे | Updated: March 17, 2025 21:18 IST2025-03-17T21:17:50+5:302025-03-17T21:18:36+5:30
Violence Erupts In Nagpur: महालात तणाव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांनी शांतता बाळगावी, असे आवाहन केले.

Nagpur Violence: औरंगजेबाच्या कबरीचा वाद तापला...! नागपूरात २ गटात तणाव; पोलिसांना धक्काबुक्की
योगेश पांडे - नागपूर
नागपूर : औरंगजेबाची कबर हटविण्यात यावी, या मागणीसाठी नागपुरातील शिवाजी पुतळा चौकात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे सोमवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी औरंगजेबाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच पोस्टर फाडण्यात आले. यामुळे महाल परिसरात दिवसभर तणावाची स्थिती होती व पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता. सायंकाळी दोन गटांत तणाव निर्माण झाला व पोलिसांनादेखील धक्काबुक्की करत कपडे फाडण्याचे प्रकार झाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती असल्याने शिवाजी पुतळा चौकात सोमवारी सकाळपासूनच गर्दी होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापुढे विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे आंदोलन करण्यात आले. औरंगजेबाची कबर शासनाने लवकरात लवकर काढावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विहिंपचे महाराष्ट्र गोवा मंत्री गोविंद शेंडे हे उपस्थित होते. आंदोलनादरम्यान विहिंप, बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. औरंगजेबचा प्रतीकात्मक पुतळा यावेळी जाळण्यात आला. नागपूरसोबतच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सोमवारी हे आंदोलन करण्यात आले असून, राज्य शासनाने राज्यातील जनतेची भावना लक्षात घेऊन तातडीने या दिशेने पावले उचलावी, अशी मागणी शेंडे यांनी केली.
दिवसभर तणाव, कडेकोट बंदोबस्त
दरम्यान, या आंदोलनामुळे परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते. आंदोलन झाल्यानंतरदेखील पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. शिवाजी पुतळा चौक, चिटणीस पार्क चौकातदेखील पोलिस बंदोबस्त होता.
सायंकाळी महालात तणाव
सायंकाळच्या सुमारास महालातील चिटणीस पार्क तसेच गांधी गेट परिसरात दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. काही तरुणांमध्ये वाद झाला आणि मग वेगवेगळ्या अफवा पसरत गेल्या. यामुळे मोठा जमाव परिसरात जमला. यावेळी घोषणाबाजीदेखील करण्यात आली. पोलिसांवरदेखील दगडफेक करण्यात आली व धक्काबुक्की करण्यात आली. यात दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे कपडेदेखील फाटले. परिस्थिती लक्षात घेता चिटणीस पार्कात अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती. काही तरुण यावेळी जखमी झाले व त्यांना मेयो इस्पितळात नेण्यात आले.
गडकरींचे आवाहन, नागपूरकरांनी शांतता बाळगावी
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांनी शांतता बाळगावी, असे आवाहन केले. महाल भागात तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण होणे दुर्दैवी असून, नागपूरकरांनी शांतता बाळगून प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. नागपूर हे शांतता व सौहार्दासाठी देशभरात प्रसिद्ध असलेले शहर आहे. या शहरात जात-पंथ-धर्म या विषयावरून वाद किंवा भांडणे होत नाहीत. आज जे काही घडले, त्यासंबंधी प्रशासन कार्यवाही करेलच. नागपूरच्या सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि शांतता प्रस्थापित होईल यासाठी स्वतः देखील प्रयत्न करावेत, असे गडकरी म्हणाले.