नागपूरमधील कामगार रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:48 IST2025-06-17T19:47:16+5:302025-06-17T19:48:08+5:30
तीन महिन्यांपासून वेतन नाही : १०० कर्मचारी संपावर, रुग्णसेवेवर परिणाम

Contractual employees at Nagpur's Kamgar Hospital face hunger strike
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा पुरवणाऱ्या सोमवारी पेठेतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. रुग्णालयात जवळपास पन्नास टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असल्याने येथील आरोग्य सेवेचा संपूर्ण डोलारा कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. हे कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर काम करत असतानाही, त्यांना मागील तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. सरकारचे या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून संपाचे हत्यार उपसले आहे. परिणामी, रुग्णालयातील रुग्णसेवा काही प्रमाणात प्रभावित झाली आहे.
विमा कामगार रुग्णालयावर जवळपास ३ लाख ६३ हजार विमा कामगार आणि त्यांचे ११ लाख ३३ हजार ७७५ कुटुंबीय अशा मोठ्या लोकसंख्येच्या आरोग्याची जबाबदारी आहे. या वैद्यकीय सेवेसाठी कामगारांच्या वेतनातून दरवर्षी कोट्यवधी रुपये रुग्णालयाला मिळतात. याच पैशांतून रुग्णालयातील डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचे पगार होतात. मात्र, सोयीसुविधा केवळ नावापुरत्याच असल्याचे चित्र आहे. मागील हिवाळी अधिवेशनात आमदार मोहन मते यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे कामगार रुग्णालयातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याकडे शासनाचे लक्ष वेधले होते. याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याचेही त्यांनी त्यावेळी सांगितले होते. परंतु, त्यानंतरही रुग्णालयातील सोयी-सुविधांमध्ये फारशी सुधारणा झालेली नाही. त्यातच 'महाराणा एजन्सी सिक्युरिटी अॅण्ड लेबर सप्लायर्स'कडून कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन तोकडे आहे. त्यातही अनेकांना फेब्रुवारी महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली. परंतु, त्यावर कोणतीही उपाययोजना होत नसल्याचे पाहून अखेर त्यांनी संप पुकारला.
कामगार मंत्र्यांना भेटणार
कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आणि कामगार आयुक्तांना दिले आहे. मंगळवारी कामगार मंत्र्यांना भेटून निवेदन देणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे. जोपर्यंत वेतनाची समस्या सुटत नाही आणि त्यांच्या इतर मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला.
क्लरिकल वगळता सर्व विभाग प्रभावित
मिळालेल्या माहितीनुसार, विमा रुग्णालयातील विविध विभागांमध्ये या एजन्सीचे जवळपास १०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी क्लरिकल विभाग वगळता टेक्निशियन विभाग, पॅथॉलॉजी विभाग, फार्मसिस्ट, नर्सेस आणि स्वच्छता कर्मचारी हे सर्वजण संपावर गेले आहेत. यामुळे रुग्णालयाच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला असून, रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.