शेतकऱ्यांना सुखावणार संततधार; पुढचे चार दिवस विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 16:27 IST2025-07-23T16:26:32+5:302025-07-23T16:27:49+5:30
मंगळवारी तुरळक सरींचा गारवा : वर्धा, ब्रह्मपुरीत दमदार हजेरी

Continuous rains will make farmers happy; Moderate to heavy rains forecast in Vidarbha for the next four days
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या दहा-बारा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने विदर्भात काही ठिकाणी दमदार हजेरी लावली. वर्धा व ब्रह्मपुरी येथे जोरदार पाऊस बरसला. पुढच्या चार दिवसांत व विशेषतः २४ जुलैपासून विदर्भात विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
नागपूर येथे तुरळक सरी झाल्या. वारंवार ढग दाटून आले; पण, त्यातून जोर-धार बरसली नाही. उलट दिवसभर नागपूरकरांना उकाड्याचा सामना करावा लागला. आर्द्रता ८५ टक्क्यावर होती व ढगांमुळे पारा २ अंशाने घसरत ३२.६ अंशावर आला. त्यामुळे सायंकाळी काहीसा गारवा जाणवायला लागला होता. दरम्यान, मंगळवारी वर्धा येथे ७३ मि.मी. पाऊस झाला, तर ब्रह्मपुरी येथे ४१ मि.मी. पावसाची नोंद झाली. चंद्रपूरला १३ मि.मी. पाऊस झाला. भंडारा, अमरावती, यवतमाळात तुरळक सरी आल्या. त्यामुळे तापमानात अंशतः घट झाली.
बुधवार, २३ जुलैला हलका ते मध्यम पाऊस होईल. त्यानंतर २४ ते २६ जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार व काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नागपूरला २५ रोजी, गोंदियात २४ व २५ रोजी, भंडारा २६, चंद्रपूर २४ तर गडचिरोलीत २४ व २६ रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम विदर्भात मात्र किरकोळ हजेरी लागेल, असा अंदाज आहे.