The contamination of lakes will be checked in Nagpur city | नागपूर शहरातील तलावांचे प्रदूषण तपासणार
नागपूर शहरातील तलावांचे प्रदूषण तपासणार

ठळक मुद्देमनपाचा पुढाकार; वॉटर अ‍ॅनालायझर खरेदी करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील तलाव संवर्धनासाठी महापालिका पुढाकार घेत आहे. शहरातील १३ तलाव आहेत. यातील अंबाझरी, गांधीसागर, फुटाळा आणि गोरेवाडा अशा चार प्रमुख तलावांतील प्रदूषण तपासणार आहे. यासाठी वॉटर अ‍ॅनालायझर खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. या यंत्राद्वारे पाण्यातील ऑक्सिजनची मात्रा, पीएच पातळी आणि तलावात विरघळलेला घन तपासला जाणार आहे. प्रदूषण पातळीनुसार उपाययोजना केल्या जाणार आहे.
चार प्रमुख तलावासह शहरात पांढराबोडी, नाईक तलाव, सोनेगाव, सक्करदरा, पोलिस लाईन टाकळी तलाव, लेंडी तलाव, बिनाकी मंगळवारी आणि संजयनगर तलाव आहे. तलावातील प्रदूषण पातळी तपासण्यासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या वॉटर अ‍ॅनालायझरची किंमत २० ते २५ लाखांच्या आसपास आहे. या यंत्रामुळे तलावातील 'सॅम्पल'ची दैनंदिन प्रदूषण पातळी तपासण्यात येईल. चोवीस तासांत एकदा अशी ही तपासणी असेल. यात पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण, पीएचची पातळी आणि तलावात विरघळलेला घन आदींचा समावेश आहे. सध्या शहरातील सर्व तलाव कोरडे पडत असून मृतावस्थेकडे जात आहेत. तलावांसाठी मनपा नीरीची मदत घेणार आहे. नाईक तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी नीरीने यापूर्वीच पुढाकार घेतल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. अंबाझरी, गोरेवाडा आणि नाईक तलावात गडरचे पाणी व इतर औद्योगिक कचरा टाकला जातो. या तलावातील पाणी आधीच प्रदूषित झाले आहे. नव्या यंत्राच्या खरेदीनंतर तलावाची दैनंदिन प्रदूषण पातळी तपासल्याने उपाययोजना करण्यास मदत होईल.
शहरातील तलावांना एकमेकांशी कसे जोडता येईल, यावर माहिती घेतली जात आहे. तलावजोड केल्यास अतिवृष्टीचे पाणी आणि अनेक भागांतील जादाचे पाणी तलावात वाहून जाईल. यामुळे शहराची पाणीपातळी सुधारून पाणीपातळीत भर पडेल. यामुळे शहरातील पाण्याचा असमतोलपणा दूर होऊन नैसर्गिकदृष्ट्या साचलेल्या पाण्याचा प्रभावीपणे वापर शक्य होईल. शहरात असलेले पारंपरिक पाण्याचे स्रोत हे पावसाळ्यातच भरतात, याचाही फायदा पाणीपातळी वाढण्यात होईल.

तलावातील कचरा काढण्यासाठी बोट
मनपाने तलावातील केरकचरा काढण्यासाठी १.३० कोटी किमतीची अ‍ॅक्वाटिक कचरा साफ करणारी बोट खरेदी करण्याचे प्रस्तावित केले आहे. यातील ७५ लाखांचा सीएसआर निधी हुडकोने देण्यास मान्यता दिल्याची माहिती आहे.

Web Title: The contamination of lakes will be checked in Nagpur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.