नागपुरात ५० वस्त्यांत होतोय दूषित पाणीपुरवठा ४ लाख नागरिकांना आजारांचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 15:59 IST2026-02-19T15:48:22+5:302026-02-19T15:59:14+5:30
Nagpur : महापौरांच्या बैठकीत मुद्दा उपस्थित; सात दिवसांत समस्या सोडविण्याचे निर्देश

Contaminated water supply in 50 settlements in Nagpur, putting 4 lakh citizens at risk of diseases
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील नऊ झोनमधील सुमारे ५० वस्त्यांत दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे जवळपास ४ लाख नागरिकांना आजारांचा धोका निर्माण झालेला आहे. हा गंभीर प्रकार असल्याने महापौर नीता ठाकरे यांनी याची दखल घेत सात दिवसांत ही समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
स्थायी समिती सभागृहात बुधवारी आयोजित जलप्रदाय विभागाच्या आढावा बैठकीत महापौरांनी महापालिका आणि ऑरेंज सिटी वॉटरच्या (ओसीडब्ल्यू) कामाचा आढावा घेतला. दूषित पाण्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्याचे निदर्शनास आले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, काही भागांत पाणी बिलांमध्ये अनेक पटींनी वाढ झाल्याच्या तक्रारींची दुरुस्ती करा, तसेच पाइपलाइनसाठी करण्यात आलेल्या खोदकामाची तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश महापौरांनी दिले. बैठकीस सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बनर्जी, कार्यकारी अभियंता श्रीकांत वायकर आदी उपस्थित होते.
कोणत्या भागात आहेत समस्या...
- लक्ष्मीनगर झोन : अजनी येथील ईस्ट समर्थ नगरमध्ये तक्रारी.
- धरमपेठ झोन : दाभा बस्ती, पांढराबोडी, पंचशील नगर प्रभावित.
- धंतोली : वंजारी नगर (जुना ईएसआर) व वसंत नगर
- नेहरूनगर : नंदनवन लेआउट, कवेलू क्वॉर्टर, गुरुदेव नगर, ताजबाग सिंधी बस्ती व दरगाह परिसर.
- गांधीबागः सिरसपेठ, गुलाब बाबा मठ, जलालपुरा, मिर्झा गली खदान, गणेशपेठ, राजाबक्षा, लोधीपुरा प्रभावित.
- सतरंजीपुरा : इतवारी रेल्वे स्टेशन परिसर, प्रेम नगर, ठक्कर ग्राम, धीवरपुरा, गोसावी घाट, देवघरापुरा, भानखेड़ा, पीली मरबत चौक, विनोबा भावे नगर व इतर.
- लकडगंज : गिरिजा नगर, गजानन मंदिर परिसर, भांडेवाडी झोपडपट्टी, पारडी, सुभान नगर ईएसआर क्षेत्र, रामपेठ, वैरागडे वाडी, एचबी टाउन प्रभावित.
- आसीनगर : पवन नगर, योगी अरविंद नगर, आनंद बुद्ध विहार, हडको कॉलनी, नारा गाव, बाबादीप सिंह नगर येथे दूषित पाणी.
- मंगळवारी : हसनूर आयटीआय, बोरगाव, मंजापूर येथील निखरे लेआउटमध्ये प्रदूषणाची नोंद.
बैठकीत दुर्गंधीयुक्त व गढूळ पाण्याच्या सतत येणाऱ्या तक्रारींवर चर्चा झाली. हनुमाननगर झोनमध्ये मात्र सध्या दूषित पाण्याची कोणतीही तक्रार नसल्याचे सांगण्यात आले.
१०३ पाण्याच्या टाक्या
महानगरपालिकेच्या एकूण १०३ पाण्याच्या टाक्या आहेत, त्यात स्मार्ट सिटीच्या ४ टाक्यांचा समावेश आहे. या टाक्यांमधून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. नागरिकांना दरमहा पाणी बिल सहज भरता यावे यासाठी जलप्रदाय विभाग व ओसीडब्ल्यूकडून क्यूआर कोड स्कॅन करून बिल भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ऑनलाइन भरण्याचे प्रमाण ३३ टक्क्यांवरून ४८ टक्क्यांपर्यंत वाढल्याची माहिती ओसीडब्ल्यू अधिकाऱ्यांनी दिली.