नागपूर मेट्रोचे बांधकाम ५० महिन्यांत २५ कि़मी. पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 10:15 PM2019-09-05T22:15:52+5:302019-09-05T22:18:21+5:30

५० महिन्यांत शहरात २५ कि़मी.चे अर्थात दोन महिन्यात एक कि़मी.चे बांधकाम पूर्ण केले आहे. ही महामेट्रोसाठी मोठी उपलब्धी असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी दिली.

Construction of Nagpur Metro 25 km in 50 months Done | नागपूर मेट्रोचे बांधकाम ५० महिन्यांत २५ कि़मी. पूर्ण

नागपूर मेट्रोचे बांधकाम ५० महिन्यांत २५ कि़मी. पूर्ण

Next
ठळक मुद्देचार स्टेशन तयार : सहा स्टेशन जानेवारीपर्यंत पूर्ण होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अ‍ॅक्वा लाईनमुळे महामेट्रोच्यानागपूरमेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या यशात पुन्हा एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्रकल्पाचे भूमिपूजन ३१ मे २०१५ ला झाले होते. त्यानंतर ५० महिन्यांत शहरात २५ कि़मी.चे अर्थात दोन महिन्यात एक कि़मी.चे बांधकाम पूर्ण केले आहे. ही महामेट्रोसाठी मोठी उपलब्धी असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी दिली.
हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डी इंटरचेंजपर्यंत (अ‍ॅक्वा लाईन) ११ कि़मी. मेट्रोच्या व्यावसायिक सेवेचा शुभारंभ ७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर दीक्षित यांनी लोकमतशी विशेष बातचीत केली.
दीक्षित म्हणाले, खापरी-सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनदरम्यान (ऑरेंज लाईन) सेवेचा शुभारंभ ७ मार्च २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून करण्यात आला. आता अ‍ॅक्वा लाईनवर ११ कि़मी.चे ट्रॅक टाकण्यात आले आणि चार स्टेशन तयार आहेत. अ‍ॅक्वा लाईन आणि ऑरेंज लाईनवर उर्वरित मेट्रो स्थानकाचे बांधकाम जानेवारी २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे. दीक्षित यांनी सांगितले की, अ‍ॅक्वा लाईनमध्ये जागेच्या अधिग्रहणात अनेक समस्या आल्या. जागेच्या अधिग्रहणावेळी सात ते आठजण सर्वोच्च न्यायालयात गेले. पण निकाल आमच्या बाजूने लागल्याने प्रकल्पाला गती मिळाली आणि काम वेगात पूर्ण होत आहे.
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे शहराला नवे आणि प्रगतिशील नागपूर म्हणून ओळख मिळाली आहे. पूर्वी जे आम्ही अपेक्षित केले होते, त्यापेक्षाही अधिक सुंदर आणि सर्वोत्तम बांधकाम झाले आहे. अर्थात स्वप्नाहून सुंदर मेट्रोची उभारणी झाल्याचे दीक्षित म्हणाले.
‘माझी मेट्रो’च्या यशाचे श्रेय नागपूरकरांना
दीक्षित म्हणाले, नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान नागपूरकरांचे भरपूर सहकार्य मिळाले आणि पुढेही मिळेल, अशी अपेक्षा आहे. महामेट्रोची संपूर्ण चमू आणि जवळपास १० हजार कामगारांच्या कठोर परिश्रमामुळेच मेट्रो प्रकल्पाची उभारणी नागपूरकरांना दिसत आहे. याचे श्रेय या सर्वांना आहे.
आतापर्यंत ५८०० कोटींचा खर्च
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात प्रस्तावित गुंतवणूक ८,६८० कोटी रुपयांची आहे. यामध्ये महामेट्रोने जर्मनी आणि फ्रान्स येथील वित्तीय संस्था, केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक साहाय्याने आतापर्यंतच्या प्रकल्प उभारणीवर ५,८०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. नियोजन आणि योजनाबद्ध पद्धतीने प्रकल्पाचे बांधकाम करण्यात आल्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात ८ ते १० टक्क्यांची बचत करण्यात आल्याचे दीक्षित यांनी दिली.
हाँगकाँग मेट्रोच्या वित्तीय मॉडेलवर अंमलबजावणी
हाँगकाँग मेट्रोच्या वित्तीय मॉडेलचा अवलंब नागपूर मेट्रो प्रकल्पात करण्यात येत आहे. यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त महसूल बिगर किराया उत्पन्नातून (नॉन-फेअर रेव्हेन्यू) मिळविण्यावर भर आहे. याकरिता राज्य सरकारचे भरपूर सहकार्य मिळाले आहे. शासनाची टीडीओ पॉलिसी मदतनीस ठरत आहे. मेट्रो रेल्वेच्या आजूबाजूला ५०० मीटरपर्यंत एफएसआय दुप्पट झाला आहे. त्यांचा लोकांना फायदा झाला आहे.
माझी मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच मंजुरी
नागपूर मेट्रो देशातील आठव्या क्रमांकाची आहे. पहिल्या टप्प्यात खापरी ते ऑटोमोटिव्ह चौक आणि लोकमान्यनगर ते प्रजापतीनगरपर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात बुटीबोरी, हिंगणा, वाडी, कन्हान, ट्रान्सपोर्टनगरपर्यंत मेट्रो धावणार आहे. दुसऱ्या टप्प्याच्या डीपीआरला राज्य शासनाची मंजुरी मिळाली असून अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.
‘माझी मेट्रो’ने प्रवासाचे फायदे
माझी मेट्रोने प्रवास करण्याचे अनेक फायदे आहेत. मेट्रोने प्रवास केल्यास शहरात वाहनांपासून होणाऱ्या वायू प्रदूषणवर नियंत्रण येण्यासह लोकांची पेट्रोल, वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. नागपूर व नागपूरबाहेरील रहिवाशांना सुरक्षित व सुव्यवस्थित वाहतूक सेवा मिळणार आहे. प्रवाशांनी स्वत:चे वाहन घरी सोडून मेट्रोने प्रवास केल्यास अन्य वाहतूक सेवांचा रोजगार वाढणार असल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले.

Web Title: Construction of Nagpur Metro 25 km in 50 months Done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.