काँग्रेस काढणार शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा

By गणेश हुड | Updated: May 31, 2025 19:54 IST2025-05-31T19:52:24+5:302025-05-31T19:54:29+5:30

काँग्रेसने ‘शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा’ काढण्याची घोषणा केली

Congress to hold farmers' self-respect march | काँग्रेस काढणार शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा

काँग्रेस काढणार शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा

गणेश हूड, नागपूर: काँग्रेस प्रदेश समितीने ३ जून रोजी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील दाभडी येथील ओंकारश्वर मंदीरातून ‘शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा’ काढण्याची घोषणा केली आहे.  या यात्रेचे रुपांतर आर्णी बाजार समितीमध्ये  भव्य शेतकरी मेळाव्यात होणार असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. 

या पदयात्रेचे नेतृत्व  प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ करणार आहेत. खासदार प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर, माणिकराव ठाकरे आदी या पदयात्रेत सहभागी होतील.  विदर्भातील सर्व खासदारांनाही आमंत्रित करण्यात आल्याची माहिती शिवाजीराव मोघे यांनी दिली.

२० मार्च २०१४ रोजी दाभडीमध्ये तत्कालीन पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी 'चहावर चर्चा' दरम्यान शेतकर्‍यांशी संवाद साधताना १९ आश्वासने दिली होती.  यानंतर मोदी पंतप्रधान झाले. परंतु यापैकी १८ आश्वासनांची पूर्तता अद्यापही केलेली नाही. केवळ नर्मदा नदीवर धरण बांधून विदर्भाला पाणी देण्यासाठी पुढाकार सुरू झाला आहे. शेतकर्‍यांच्या कर्ज माफीबाबत  फक्त चर्चा आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केलेल्या नाहीत, कृषी उत्पादीत माल विशेषत: कापूस आणि सोयाबीन यांना आश्वासनानुसार भाव  मिळत नाही. बँकांनी पीक कर्जाचे व्याज दर कमी केलेले नाही. शेतकरी आत्महत्या मागील १० वर्षांत वाढल्या आहेत. या सर्व गोष्टींच्या निषेधात किसान पड्यादत्रा  काढली जाणार आहे. आपली फसवणूक व दिशाभूल झाल्याची जाणीव शेतकर्‍यांना झाली आहे. पत्रकार परिषदेला गिरीश पांडव उपस्थित होते.

Web Title: Congress to hold farmers' self-respect march