लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विषारी कफ सिरपमुळे झालेल्या बालकांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणातील कोणत्याही दोषीला सोडणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट ग्वाही मध्य प्रदेशचेमुख्यमंत्री मोहन यादव यांनी गुरुवारी नागपुरात दिली. सोबतच या प्रकरणावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांना लक्ष्य करत तामिळनाडू सरकार आणि काँग्रेस पक्षाला प्रश्न विचारले. काँग्रेसने तामिळनाडूत जाऊन आंदोलन करावे, असा टोलाही लावला.
विशेष म्हणजे, मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ल यांनी मंगळवारी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला (एम्स) भेट दिली होती. परंतु, त्याच दिवशी दोन बालकांचा मृत्यू झाला, तर आज मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मेडिकलला भेट दिली आणि ते रुग्णालयातून बाहेर पडताच आणखी एका बाळाचा मृत्यू झाला.
मध्य प्रदेशातील कफ सिरपच्या गंभीर रुग्णांवर नागपुरात उपचार सुरू आहेत. त्यांची भेट व उपचाराची माहिती घेण्यासाठी गुरुवारी मुख्यमंत्री यादव यांनी 'एम्स' व 'मेडिकल'ला भेट दिली. 'एम्स' येथे उपचार घेत असलेल्या दोन बालकांच्या प्रकृतीची पाहणी केली आणि त्यांच्या नातेवाइकांशी संवाद साधला. यावेळी 'एम्स'चे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीलेश नागदेवे उपस्थित होते. मेडिकलच्या भेटीदरम्यान अधिष्ठाता डॉ. राज गजभिये आणि बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. मनीष तिवारी यांच्याकडून त्यांनी उपचारांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
औषधी कंपनीचा रद्द झालेला परवाना पुन्हा मिळाला
मुख्यमंत्री यादव म्हणाले, या प्रकरणात जे राजकारण करत आहेत, त्यांनी आधी तामिळनाडूत जाऊन कंपनीला ड्रग परवाना कसा दिला हे विचारावे. एकदा परवाना रद्द झाल्यावर त्यांना पुन्हा परवाना कसा मिळाला, हाही प्रश्न आहे. एवढ्या लहान जागेत ही फॅक्टरी कशी सुरू होते ? यावर काँग्रेसने तामिळनाडूमध्ये आंदोलन करावे, वाटल्यास राहुल गांधींनीही तेथे जावे.
'तामिळनाडू सरकार सहकार्य करत नाही'
- मुख्यमंत्री यादव यांनी, तामिळनाडूमध्ये कफ सिरप तयार करणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, या प्रकरणाचा चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई निश्चित केली जाईल.
- मध्य प्रदेशात औषधी लिहून देणाऱ्या 3 डॉक्टरांसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
- दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. कफ सिरप प्रकरणाबाबत आपले सरकार अत्यंत संवेदनशील आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Web Summary : MP CM Mohan Yadav assures strict action in cough syrup deaths. He criticizes opposition for politicizing the issue, urging protests in Tamil Nadu regarding the drug license.
Web Summary : मध्य प्रदेश के मुख्यमंत्री मोहन यादव ने कफ सिरप से हुई मौतों पर सख्त कार्रवाई का आश्वासन दिया। उन्होंने विपक्ष की आलोचना करते हुए तमिलनाडु में दवा लाइसेंस पर विरोध प्रदर्शन का आग्रह किया।