लहान पक्षांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका आघाडीसाठी घातक - सुरेश माने
By आनंद डेकाटे | Updated: March 7, 2024 19:03 IST2024-03-07T19:03:35+5:302024-03-07T19:03:46+5:30
आघाडी करताना लहान पक्षांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवणे हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेहमी धोरण राहिले आहे.

लहान पक्षांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका आघाडीसाठी घातक - सुरेश माने
नागपूर: आघाडी करताना लहान पक्षांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवणे हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेहमी धोरण राहिले आहे. त्यांची ही भूमिकाच आघाडी होण्यासाठी घातच ठरते, अशी टीका बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे (बीआरएसपी)चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष एड. सुरेश माने यांनी गुरूवारी येथे पत्रपरिषदेत केले.
ॲड. माने म्हणाले, भाजप व संघ परिवार कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सत्तेत येऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीसोबत आघाडी करण्यास तयार आहोत. यापूर्वीही आम्ही आघाडीसोबतच होतो. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीने आतापर्यंत तरी आमच्याशी साधी चर्चाही केलेली नाही. इतर छोट्या पक्षांसोबत सुद्धा त्यांची अशीच भूमिका असते. शेवटच्या घटकेत युती होणे हे योग्य राहत नाही. छोट्या पक्षांना निवडणुकीसाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे हे आघाडीसाठी घातक ठरते.
येत्या १५ मार्च रोजी कांशीराम यांच्या जन्मदिनी पक्षातर्फे नागपुरातील इंदोरा मैदान येथे निवडणुक महासभा आयोजित करण्यात आली आहे. यासभेला राष्ट्रीय शोषित समाज पार्टीचे अध्यक्ष व माजी खासदार स्वामीप्रसाद मौर्य, आयएनएलचे प्रो. मोहम्मद सुलेमान, छोटूभाई वसावा, रामबक्श वर्मा, पृथ्वीराज,साहेबसिंह धनगड प्रामुख्याने उपस्थित राहतील. या सभेत आपण निवडमुकीबाबतची भूमिका जाहीर करू, असे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील, विशेष फुटाणे, विश्रांती झामरे, डॉ. विनोद रंगारी उपस्थित होते.
खरे असाल तर निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नाही लिहून द्या
वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेला (उद्धव ठाकरे) निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नाही, असे लिहून द्यायला सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे समर्थन करीत एड. सुरेश माने यांनी खरे असाल तर निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नाही हे लिहून द्यायला काय हरकत आहे, असे म्हटले. दोघांनीही एकमेकांकडून असे लिहून घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. गेल्या निवडणुकीत वंचितची जी ताकद दिसून आली ती एमआयएमसोबत असल्यामुळे होती. महाविकास आघाडी वंचितला इतके महत्व देत आहे, त्याचे काय होते, ते लवकरच समजेल असेही ते म्हणाले.