"सीमावर्ती भागातील पराभव भाजपने बघावा; उलटगिनती महाराष्ट्रातूनच सुरू होईल"
By कमलेश वानखेडे | Updated: December 4, 2023 16:07 IST2023-12-04T16:07:00+5:302023-12-04T16:07:30+5:30
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर साधला निशाणा

"सीमावर्ती भागातील पराभव भाजपने बघावा; उलटगिनती महाराष्ट्रातूनच सुरू होईल"
कमलेश वानखेडे, नागपूर: तेलंगणा, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यातील महाराष्ट्राला लागून असलेल्या मतदारसंघाचा निकाल एकदा भाजपने बघावा. सीमावर्ती भागात भाजपला झटका बसला असून काँग्रेस विजयी झाले आहे. या निकालावरून महाराष्ट्रात काय होऊ शकते याचा अंदाज भाजपला येईल. तीच लहर महाराष्ट्रात आहे. लकवरच महाराष्ट्रात मोठे परिवर्तन झाल्याचे देशाला बघायला मिळेल. भाजपची उलटगिनती महाराष्ट्रातूनच सुरू होईल, असा दावा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला.
पटोले म्हणाले, जनमताच्या आम्ही आदार केला आहे. या निकालानंतर कुठे त्रुटी राहिल्या याचे अवलोकन केले जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी सुरू झाली आहे. या निकालाने आम्ही खचणार नाही. उलट २०१८ च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी चारही राज्यात काँग्रेसची मते वाढली आहेत. याचा लोकसभेत फायदाच होईल. ‘इंडिया’ आघाडीबाबत कुणीही काहीही चर्चा केली तरी फरक पडत नाही. काँग्रेस तडजोड न करणारा पक्ष आहे. काँग्रेस सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी आहे. आतापासूनच राज्यात भाजपचे सरकार येईल आणि वानखेडे स्टेडियमवर शपथ घेऊ असे कुणी म्हणत असेल तर हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचा अद्याप भाजपने योग्य विचार केलेला दिसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
काँग्रेस फूटणार नाहीच!
चार राज्यांच्या निकालानंतर काँग्रेस फुटणार असे दावे केले जात आहेत. मात्र, या दाव्यांमध्ये तत्थ्य नाही. . या चर्चेला आता पूर्णविराम देण्याची गरज आहे, असेही पटोले म्हणाले.