लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. काँग्रेसच्या देशव्यापी आंदोलनांतर्गत शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेसने सोमवारी संविधान चौकात संयुक्तपणे धरणे-निदर्शने केली. शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे आणि जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली. पक्षाशी संबंधित इतर संघटनांनीही विविध ठिकाणी आंदोलन केले.
सायकल रॅली काढली युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके व शहर अध्यक्ष तौसीफ खान यांच्या उपस्थितीत अक्षय घाटोळे व प्रज्वल शनिवारे यांच्या नेतृत्वात पेट्रोल- डिझेल दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली. बगडगंज येथील कापसे चौकातून निघालेल्या या रॅलीमध्ये इरफान काजी, वसीम शेख, राहुल बावरे, मनीष मारशेट्टीवार, ऋषभ धुळे, आकाश मल्लेवार,अभिषेक धोटे,विजय मिश्रा,रोहित मोटघरे, नितीन जुमळे, संदीप मस्के, हर्षल हजारे, शुभम कोहळे, मिथिलेश दुधनकर आदी सहभागी झाले होते.
मुळक यांनी आकडेवारीच जाहीर केली माजी अर्थ व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी आकडेवारीच सादर करीत पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध केला. त्यांनी सांगितले की, २०१९-२० मध्ये कच्च्या तेलाचे सरासरी मूल्य ६० डॉलर प्रति बॅरल होते. मार्चमध्ये ते ३३ डॉलर व एप्रिलमध्ये २६ डॉलरवर आले. पेट्रोलचे मूल्य कमी झाल्याने केंद्र सरकारला जवळपास ३ लाख कोटी रुपयांची बचत होणे अपेक्षित होते. परंतु सरकारने २० दिवस सलग पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ केली. ही वाढ अशा परिस्थितीत करण्यात आली आहे, जेव्हा लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून लोकांच्या हाताला काम नाही. सीएमआयईच्या अहवालानुसार, लॉकडाऊनमुळे देशात जवळपास १२ कोटी लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे. अशा वेळी नागरिकांना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकारने पेट्रोल- डिझेलमध्ये सातत्याने दरवाढ करीत त्यांचे कंबरडे मोडले आहे.