बीटी कापसाच्या बियाण्यांच्या लेबल क्लेममध्ये संभ्रम: शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान?

By सुनील चरपे | Updated: June 7, 2025 12:43 IST2025-06-07T12:42:22+5:302025-06-07T12:43:03+5:30

टुथफुल लेबल बियाण्यांवर भर : प्रमाणित बियाणे मागणी करूनही मिळेना

Confusion in label claims of Bt cotton seeds: Financial loss to farmers? | बीटी कापसाच्या बियाण्यांच्या लेबल क्लेममध्ये संभ्रम: शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान?

Confusion in label claims of Bt cotton seeds: Financial loss to farmers?

सुनील चरपे 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
कापूस उत्पादकांना २५ वर्षापासून संकरित बीटी कापसाचे प्रमाणित (सर्टिफाइड) बियाणे मागणी करूनही मिळत नसल्याने टुथफुल लेबल असलेली बियाणे वापरावे लागते. या बियाण्यांच्या पाकिटांवरील लेबल क्लेममध्ये नमूद केलेली जनुकांची टक्केवारी संभ्रमित करणारी आहे.


बियाणे कायदा १९६६ नुसार बियाण्यांच्या लेबल क्लेममध्ये बियाण्यांची भौतिक व आनुवंशिक शुद्धता, इतर बाबी, इतर पिकांचे व तण बियाणे, उगवण शक्ती, ओलावा आणि बीटी प्रथिने व त्यांचे प्रमाण आदी महत्त्वाच्या बाबी नमूद असतात. प्रत्येक कंपन्यांच्या पाकिटांवर बीटी जनुकांचे प्रमाण ९० ते ९५ टक्के असल्याचे नमूद आहे.


पाकिटांमधील बियाण्यांची संख्या किती, या बियाण्यांमधील बीटी जनुकांची टक्केवारी नेमकी कशी काढली, या जनुकांचे कापसाचे खोड, पाने, पात्या, फुले व सरकी यातील प्रमाण किती, बियाणे उगवल्यानंतर त्या झाडांमध्ये बीटी जनुके कार्यक्षम राहण्याचा काळ किती या मूलभूत बाबी कळायला मार्ग नाही. राज्य सरकारचा कृषी विभागदेखील या बाबी कधीच बारकाईने तपासून बघत नाही. या बाबी शेतकऱ्यांच्या फसवणुकीला कारणीभूत ठरू शकतात, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटना तंत्रज्ञान व कृषी विज्ञान विस्तार आघाडी प्रमुख मिलिंद दामले यांनी व्यक्त केली आहे.


न विकलेले बियाणे परत
प्रत्येक कंपनी दुकानदारांकडून न विकलेले बियाणे दरवर्षी परत घेते. बियाणे उत्पादनाचा खर्च अधिक असल्याने ते बियाणे नष्ट करणे शक्य नाही. त्यामुळे पुढील वर्षी ते बियाणे नवीन पाकिटांमध्ये बाजारात येते.


बियाणे उत्पादन वर्ष कळेना
लेबल क्लेमवर बियाणे उत्पादनाचे वर्ष नमूद नसते. त्यामुळे ते बियाण्याचे उत्पादनाचे वर्ष व राज्य तसेच ते बियाणे एफ-१ आहे की एफ-२ आहे हे कुणालाही कळत नाही. एफ-१ च्या तुलनेत एफ-२ बियाण्यांची उत्पादकता कमी असते.

Web Title: Confusion in label claims of Bt cotton seeds: Financial loss to farmers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.