संगणक प्रशिक्षणाच्या नावाखाली लाखोंचा अपहार? लॉकडाऊनमध्ये सर्वच बंद असताना प्रशिक्षण दिले तरी कुणाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 17:06 IST2021-09-24T17:04:05+5:302021-09-24T17:06:29+5:30
विभागाद्वारे संगणक प्रशिक्षणावर १४ लाख ८६ हजार २०० रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते. जर प्रशिक्षणच झाले नाही तर तो निधी सभापतींनी परस्पर हडपला का? असा गंभीर आरोप समितीच्या सदस्य राधा अग्रवाल यांनी केला आहे.

संगणक प्रशिक्षणाच्या नावाखाली लाखोंचा अपहार? लॉकडाऊनमध्ये सर्वच बंद असताना प्रशिक्षण दिले तरी कुणाला?
नागपूर :जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती उज्वला बोढारे यांच्यावर संगणक प्रशिक्षणाच्या नावाखाली १५ लाखांचा अपहार केल्याचा ठपका समितीच्या सदस्य राधा अग्रवाल यांनी ठेवला आहे. कोरोनाच्या काळात सर्व बंद असताना संगणकाचे प्रशिक्षण कुणाला आणि कोठे दिले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
विशेष म्हणजे नुकताच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राधा अग्रवाल यांनी समितीच्या सदस्यांना अंधारात ठेवून सभापतींनी दीड कोटीची खरेदी केल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर च्यवनप्राशच्या मुद्यावरून सभापतींनी समितीची दिशाभूल केल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवला होता. सभापतीच्या विरुद्ध सदस्यांकडून जाहीर आरोप होत असताना सभापतींनी साधलेल्या चुप्पीमुळे चर्चांना उधाण येत आहे. आर्थिक घोटाळ्यावरही शंका उपस्थित केली जात आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीची पोटनिवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांचे राजकारण चांगलेच तापले आहे. जिल्हा परिषदेच्या सेस फंडांतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात वर्ग सातवी ते बारावी पास मुलींना संगणक प्रशिक्षण देण्याची योजना राबविण्यात आली. त्यासाठी ३० लाखांची तरतूद करण्यात आली होती. प्रति प्रशिक्षणार्थी ४ हजार २०० रुपयांचे अनुदान देण्याचे प्रस्तावित होते. मार्च २०२० पासून जिल्ह्यात लॉकडाऊन लागले. शिवाय सर्व शिक्षण ऑनलाईन सुरू आहे. त्या काळात मुलींना संगणक प्रशिक्षण कसे दिले? असा सवाल सदस्य राधा अग्रवाल यांनी उपस्थित केला.
विभागाद्वारे यावर १४ लाख ८६ हजार २०० रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते. जर प्रशिक्षणच झाले नाही. तर तो निधी सभापतींनी परस्पर हडपला का? असा गंभीर आरोप त्यांनी केला. जिल्हा परिषदेतील सदस्यांसह समिती सदस्यांना या योजनेबाबत विचारणा केली असता त्यांच्या सर्कलमध्ये असे प्रशिक्षणच झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
प्रशिक्षणच झाले नाही. तर विभागाने खर्च कसा दाखविला, हे कोडेच ठरत आहे. विभागात संगणक प्रशिक्षण घोटाळा झाला असून याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार.
राधा अग्रवाल, सदस्य, महिला व बाल कल्याण समिती