Comprehensive response to Bharat Bandha against CAA-NRC in Nagpur | सीएए-एनआरसी विरोधात भारत बंदला नागपुरात संमिश्र प्रतिसाद

सीएए-एनआरसी विरोधात भारत बंदला नागपुरात संमिश्र प्रतिसाद

ठळक मुद्देउत्तर, पूर्व आणि मध्य नागपुरात दिसला परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारत मुक्ती मोर्चा तसेच बहुजन क्रांती मोर्चा यांनी सीएए-एनआरसी विरोधात केलेल्या भारत बंदच्या आवाहनाला बुधवारी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. उत्तर, पूर्व आणि मध्य नागपुरात बंदचा चांगला परिणाम दिसून आला तर पश्चिम, दक्षिण आणि दक्षिण-पश्चिममध्ये मात्र संमिश्र प्रतिसाद होता. दुकाने व प्रतिष्ठाने बंद होती. तसेच शाळा, कॉलेज, शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांची संख्या रोडावल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी स्कूल ऑटो बंद होते. मॉलमध्येही फारसे ग्राहक नव्हते.उत्तर नागपूर
उत्तर नागपुरातील प्रमुख व्यापारी भागातील प्रतिष्ठाने दिवसभर बंद होती. कमाल चौक, लष्करीबाग, १० नंबर पूल, वैशालीनगर रोड, आसीनगर, इंदोरा चौक, टेका नाका, सिद्धार्थनगर, यशोधरानगर, गरीबनवाजनगर, राणी दुर्गावती चौक ते मोहम्मद रफी चौकपर्यंतची दुकाने बंद होती. उत्तर नागपुरातील पाचपावली उड्डाण पुलावरून वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. उड्डाण पुलावर उभे राहून कार्यकर्ते भारत बंदच्या घोषणा देत होते. जरीपटका परिसरातील बाजारातही संमिश्र प्रतिसाद दिसून आला. टेकानाका चौकात दुपारी कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

मध्य नागपूर
मोमीनपुरा मार्केट पूर्णपणे बंद होते. वस्त्यांमधील दुकाने सुद्धा बंद ठेवण्यात आली होती. गांजाखेत चौकातील व्यापारिक प्रतिष्ठानाचे शटर बंद होते. महालमधील शिवाजी चौक ते राम कुलर चौकापर्यंत दुकाने बंद होती. याशिवाय महालसह गांधीबाग, जागनाथ बुधवारी, इतवारी, चिटणीस पार्क, गणेशपेठ, सीए, रोड येथे बंदचा समिश्र प्रतिसाद होता.

पूर्व नागपूर
हसनबाग, सतरंजीपुरा, लकडगंज आदी ठिकाणची दुकाने बंद होती तर वर्धमाननगर, पारडी, एचबी टाऊन चौकात बंदचा संमिश्र प्रतिसाद होता.

पश्चिम नागपूर
पश्चिम नागपुरातील जाफरनगर, अवस्थी चौक, अहबाब कॉलनी, पेन्शननगर येथे प्रतिष्ठाने बंद होती. बोरगाव, गिट्टीखदान, सीताबर्डी, रामनगर, धरमपेठ येथे संमिश्र प्रतिसाद होता.

गोळीबार चौकात गोंधळ

गोळीबार चौकातील बहुतांश दुकाने सकाळपासून बंद ठेवण्यात आली होती. परंतु काही दुकाने सुरू असल्याने बंदचे आवाहन करीत कार्यकर्त्यांची गर्दी वाढत गेली. दुकाने सुरू दिसल्याने गोंधळ झाला. हा गोंधळ वाढल्याने पोलिसांनी येथे तगडा पोलीस बंदोबस्त वाढवला. गोंधळ होताच दुकानदारांनी आपापली प्रतिष्ठाने बंद केली. रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्त कायम होता.

स्कुल, कोचिंग क्लासेसवरही परिणाम
अनेक स्कूल ऑटो चालकांनी बंदच्या समर्थनार्थ ऑटोरिक्षा बंद ठेवले होते. त्यामुळे शाळेवर परिणाम दिसून आला. तर काही कोचिंग क्लासेस चालवणाऱ्यांनी स्वत:हूनच वर्ग बंद ठेवले होते. जे शिकवणी वर्ग सुरू होते. तिथे सुद्धा विद्यार्थ्यांची संख्या कमी होती.

Web Title: Comprehensive response to Bharat Bandha against CAA-NRC in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.