२४ धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 21:22 IST2019-08-05T21:20:49+5:302019-08-05T21:22:34+5:30
जिल्ह्यातील २४ धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण केल्याची माहिती पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली आहे.

२४ धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील २४ धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण केल्याची माहिती पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली आहे.
दोन वर्षांपूर्वी महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू करण्यात आले. त्यानंतर यावर्षी कोकणातील तेवरे धरण फुटले. यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानीसोबत जीवितहानीही झाली. धरणाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत असताना सरकारने मात्र खेकड्यांना धरणफुटीसाठी दोषी ठरविले. सरकारकडून कंत्राटदाराला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका झाली. अनेक धरणे ही जुनी आहेत. पावसामुळे धरणाला नुकसान होऊन मोठी हानी होण्याची शक्यता आहे. तेवरे धरणाचे उदाहरण लक्षात घेता, प्रशासनाकडून सावधगिरी बाळगण्यात आली. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी जिल्ह्यातील सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले आहेत.
नागपूर विभागात जवळपास १८ मोठी धरणे असून यातील पाच धरणे नागपूर जिल्ह्यात आहेत. त्याचप्रमाणे नागपूर विभागात ४० मध्यम धरणे असून १३ नागपूर जिल्ह्यात आहेत. या सर्व धरणांची आवश्यक दुरुस्ती करून धरणाच्या स्थितीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश त्यांनी जलसंपदा विभागाला दिले होते. त्यानुसार विभागाने अहवाल सादर केला. यात पाच मोठे, १३ मध्यम तर ६ लहान धरणांच स्ट्रक्चरलऑडिट झाल्याची माहिती विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली.