Committee to probe Rajdhani Express fire | राजधानी एक्स्प्रेस आगीच्या चौकशीसाठी समिती गठीत
राजधानी एक्स्प्रेस आगीच्या चौकशीसाठी समिती गठीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिकंदराबाद-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसच्या एसएलआर कोचला बुधवारी रात्री नरखेड ते दारीमेटा दरम्यान आग लागल्यामुळे खळबळ उडाली होती. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीच्या चौकशीसाठी मुख्यालयाने समिती गठीत केली असून ही समिती आगीच्या कारणांचा शोध घेणार आहे.
रेल्वेगाडी क्रमांक १२४३७ राजधानी एक्स्प्रेस नागपूरवरून बुधवारी रात्री निजामुद्दीनकडे रवाना झाली. नरखेड ते दारीमेटा दरम्यान अचानक एसएलआर कोचमधून धुर आणि ठिणग्या निघत असल्याचे गार्डच्या लक्षात आले. त्याने त्वरीत वॉकी टॉकीवरून लोकोपायलटला याची सुचना दिली. लोकोपायलटने तातडीने गाडी थांबविली. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु झाले. आग लागलेला एसएलआर कोच वेगळा करण्यात आला. दीड तासानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. परंतु तो पर्यंत प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. घटनेची रेल्वे मुख्यालयाने गांभीर्याने दखल घेतली आहे. गुरुवारी घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली. समितीत कोण सदस्य राहतील याबाबत रेल्वे प्रशासनाने माहिती देण्याचे टाळले. समितीत तीन सदस्य राहणार असल्याची माहिती असून नागपूरचे अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक एन. के. भंडारी तपासात सहकार्य करणार आहेत. समिती घटनेची चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहे.
आगीमुळे विलंब झालेल्या गाड्या
राजधानी एक्स्प्रेसला आग लागल्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांना विलंब झाला. यात १२६२५ केरळ एक्स्प्रेस नरखेडमध्ये रात्री ९.५७ ते सकाळी ४.२७ पर्यंत उभी होती. १२१५९ अमरावती-जबलपूर एक्स्प्रेसला काटोलमध्ये रात्री १०.२६ ते सकाळी ४.३१ पर्यंत थांबविण्यात आले. १२८०७ विशाखापट्टनम-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसला काटोलमध्ये रात्री २ ते सकाळी ४.३९ पर्यंत थांबविण्यात आले. १८२३७ छत्तीसगड एक्स्प्रेसला कळमेश्वरमध्ये रात्री ११.३० ते सकाळी ४.२५ पर्यंत थांबविण्यता आले. १२६२५ तिरुअनंतपुरम एक्स्प्रेसला भुसावळमध्ये रात्री ३.३० ते सकाळी ४.३० पर्यंत थांबविण्यात आले. दिल्ली मार्गावर नागपूर रेल्वेस्थानकावर आलेली १२६४६ संपर्कक्रांती एक्स्प्रेस २ तास, १९६०४ अजमेर हमसफर एक्स्प्रेस २ तास आणि १६०३१ अंदमान एक्स्प्रेस सकाळी ५.३० पर्यंत रेल्वेस्थानकावर उभी होती.

 

Web Title: Committee to probe Rajdhani Express fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.