The colors in the poem concert are heroic, beauty, compassion, humor and satire | काव्यमैफिलीत चढरे रंग वीर, सौंदर्य, करुण, हास्य अन् व्यंग
काव्यमैफिलीत चढरे रंग वीर, सौंदर्य, करुण, हास्य अन् व्यंग

ठळक मुद्देकविसंमेलन : सैनिक कवितेने पाणावले डोळेखासदार सांस्कृतिक महोत्सवात रसिकांच्या चेहऱ्यावर पसरले हास्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कवी चंद्रावर जाऊन तेथील दुधाळ प्रकाशाने मंगळाला प्रकाशमान करू शकतो आणि गुरूवर प्राणवायू सोडून तेथे वस्ती थाटू शकतो. कवीच्या कल्पनेला कसलाच लगाम नाही आणि त्याच्या कल्पकतेतून निघणाऱ्या प्रत्येक व्यंगाला सारगर्भित संदर्भ असतो. कवी करुणरसाने रडवतो, व्यंगरसाने हसवतो आणि वीररसाने स्फुल्लिंग जागवतो. अशा आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या अतरंगी ज्येष्ठ, श्रेष्ठ कवींनी नागपूरच्या गारठवून सोडणाऱ्या गारठ्यात चेतनेची ऊर्जा भरली आणि काव्यमैफिलीतून नागपूरकर रसिकांवर वीर, सौंदर्य, करुण, हास्य अन् व्यंगरसांचे रंग उधळले गेले.
क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात सुरू असलेल्या तिसऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात शनिवारी ‘अखिल भारतीय हास्य व्यंग कविसंमेलन’ उत्साहात पार पडले. ‘यूथ आयकॉन ऑफ इंडिया’ आणि ब्रिटिश संसदेने गौरविलेल्या प्रसिद्ध अभिनेता व हास्य-व्यंग कवी शैलेश लोढा यांच्यासह नागपूरचे साहित्यिक ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर ज्येष्ठ कवी मधुप पाण्डेय, उज्जैनचे दिनेश दिग्गज, दिल्लीचे प्रवीण शुक्ल, दिल्लीच्याच गजल-गीत गायिका मुमताज नसीम, जयपूरचे संजय झाला व कोटा येथील जगदीश सोळंकी यांनी एकसाथ या कविसंमेलनात काव्यांचे कारंजे उडविले. या संपूर्ण संमेलनाचे सूत्र जगदीश सोळंकी यांनी आपल्या चिरपरिचित अंदाजात सांभाळले आणि टप्पे-टोणपे मारत रसिकांना सतत हसवण्याचे काम केले. व्यासपीठावर हजर असलेल्या सर्व कवींचे समन्वयन इतके रसिले आणि शांत डोक्याचे होते की जणू हे सगळे कायम गारठलेल्या अवस्थेत असलेल्या प्लुटोवरून आलेले असावे. एकूणच नागपूरकरांनी पडलेल्या कडाक्याच्या थंडीतही या सगळ्यांच्या काव्यरसांचा आस्वाद घेतला. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री व महोत्सवाचे प्रणेते नितीन गडकरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी माजी खासदार दत्ता मेघे, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. अनिल सोले, आ. रामदास आंबटकर, उपेंद्र कोठेकर, महापौर संदीप जोशी, भारत विकास परिषदेचे सुरेश गुप्ता, टेक्स्टाईल आयुक्त डॉ. माधवी खोडे, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण दटके उपस्थित होते. निवेदन रेणुका देशकर यांनी केले.

अनिल सोले यांच्या ‘आत्मधून’चे प्रकाशन
यावेळी आ. अनिल सोले यांच्या ‘आत्मधून’ या तिसऱ्या काव्यसंमेलनाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कविसंमेलनाच्या अघोषित नियमानुसार ज्या भागात काव्यसंमेलन असते, त्या भाषेतील एक कविता सामावून घेण्याचा पायंडा इथेही कायम ठेवण्यात आला. खास मधुप पाण्डेय यांच्या आग्रहावरून आ. अनिल सोले यांनी त्यांच्या दोन कविता संमेलनात सादर केल्या.

राजकीय टोणप्यांनी टाळ्यांचा कडकडाट
यावेळी कवींनी व्यंगात्मक कवितांतून राजकीय कटाक्षही टाकला. दिल्लीचे केजरीवाल यांनी केलेले वादे आणि वास्तवात उतरलेले वादे यावर विनोदी शैलीत प्रहार केला. सोबतच नितीन गडकरी यांनी विधानसभा निवडणुकीनंतर केलेले भाष्य ‘क्रिकेट आणि राजकारण अखेरच्या चेंडूपर्यंत चालते’ यावर कटाक्ष टाकताना तुम्हाला सुपर ओव्हरचा विसर पडला आणि महाराष्ट्रातही डॉन ब्रॅडमॅन आहे, हेही विसरला असल्याचा टोला शैलेश लोढा यांनी लगावला. यावर गडकरी मनमोकळेपणाने हसताना दिसले. सोबतच, कधी काळी दिवसाला २ किमी बनणारे रस्ते गडकरींमुळे आत २१ किमी प्रति दिवस बनत असल्याचा गौरवोद्गारही लोढा यांनी यावेळी काढले.

गडकरी कराचीतूनही निवडून येतील
नितीन गडकरी यांचे काम इतके मोठे की ते कराचीतून निवडणूक लढवतील तरी निवडून येतील. दुसरा देश तयार केला तर ते पंतप्रधानही होतील, अशी टिपणी संजय झाला यांनी केली. देशभर फिरलो पण एखाद्या खासदाराने इतका मोठा सांस्कृतिक महोत्सव पहिल्यांदाच पाहिला, असे म्हणत कवी प्रवीण शुक्ल यांनी कौतुक केले.

Web Title: The colors in the poem concert are heroic, beauty, compassion, humor and satire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.