विदर्भात थंडीला सुरुवात, पारा घसरला; पहाटेचे तापमान १६ अंशावर, आणखी घसरणार
By निशांत वानखेडे | Updated: November 8, 2025 18:29 IST2025-11-08T18:27:31+5:302025-11-08T18:29:13+5:30
Nagpur : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारपासून किमान तापमान घसरायला सुरुवात झाली आहे. ६ नाेव्हेंबरला नागपूरचा रात्रीचा पारा १९.४ अंशावर हाेता, जाे ७ नाेव्हेंबरला ४.२ अंशाची घट झाली व पहिल्यांदा सरासरीच्या खाली येत १५.८ अंशावर गेला हाेता.

Cold weather begins in Vidarbha, temperature drops; Morning temperature at 16 degrees, will drop further
नागपूर : पावसाळा संपूनही अवकाळी पावसाचा जाेर कायम राहिल्याने बाहेर पडताना रेनकाेट ठेवण्यास बाध्य असलेल्या नागरिकांची आता त्यापासून सुटका हाेणार आहे. दाेन दिवसात पारा घसरल्याने थंडी वाढायला लागली असून बॅग किंवा वाहनाच्या डिक्कीतून रेनकाेट काढून त्या जागी स्वेटर किंवा उबदार जॅकेट ठेवण्याची वेळ आली आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारपासून किमान तापमान घसरायला सुरुवात झाली आहे. ६ नाेव्हेंबरला नागपूरचा रात्रीचा पारा १९.४ अंशावर हाेता, जाे ७ नाेव्हेंबरला ४.२ अंशाची घट झाली व पहिल्यांदा सरासरीच्या खाली येत १५.८ अंशावर गेला हाेता. शनिवारी त्यात अंशत: वाढ झाली व १६ अंशाची नाेंद झाली. आताही ताे ०.९ अंशाने खाली आहे. ७ तारखेला दिवसाचे कमाल तापमान ३१.२ अंश नाेंदविण्यात आले, जे सरासरीपेक्षा ०.७ अंशाने खाली आहे.
शनिवारी त्यात आणखी घट झाल्याचे जाणवत आहे. विदर्भात वाशिम १३.२ व अमरावती १३.३ अंश किमान तापमानासह सर्वात थंड ठिकाण ठरले. चंद्रपूर शहरात सर्वाधिक १९.६ अंश व गडचिराेली १७.८ अंशाची नाेंद झाली आहे. इतर जिल्ह्यात रात्रीचे किमान तापमान १४ ते १६ अंशाच्या सरासरीत पाेहचले आहे. चंद्रपूर वगळता इतर ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या २ ते ४ अंशाने खाली घसरले आहे.
रात्रीचे तापमान घसरल्याने सकाळचे उन आता हवीहवीशी वाटायला लागली आहेत. दुपारी सूर्यकिरणांचा ताप वाढत असला तरी वातावरणातील गारव्यामुळे त्याची तीव्रता अधिक जाणवत नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात कमाल व किमान तापमानात आणखी घसरण हाेण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता नसल्याने व आकाश निरभ्र राहणाार असल्याने पारा पुन्हा घसरून थंडीत आणखी वाढ हाेईल, असा अंदाज आहे.