उपराजधानीत परत एकदा वाढला थंडीचा कडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:25 IST2019-01-09T00:23:29+5:302019-01-09T00:25:09+5:30
उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीमुळे उपराजधानीत परत एकदा थंडीचा कडाका वाढला आहे. मागील २४ तासात शहरातील किमान तापमानात ४.४ अंश सेल्सिअस इतकी घट दिसून आली. मंगळवारी शहरात ७.७ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीहून ५ अंशांहून खाली होते. विदर्भात नागपूर सर्वात थंड होते.

उपराजधानीत परत एकदा वाढला थंडीचा कडाका
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीमुळे उपराजधानीत परत एकदा थंडीचा कडाका वाढला आहे. मागील २४ तासात शहरातील किमान तापमानात ४.४ अंश सेल्सिअस इतकी घट दिसून आली. मंगळवारी शहरात ७.७ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीहून ५ अंशांहून खाली होते. विदर्भात नागपूर सर्वात थंड होते.
हवामान खात्यानुसार वातावरण कोरडे असल्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या हवेची दिशा बदलली आहे. पश्चिम-उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे हवा वाहत आहे. पर्वतीय क्षेत्रात हिमवर्षाव होत असून, उत्तरेकडे थंडीची तीव्रता वाढली आहे. हेच कारण आहे की विदर्भात अचानक तापमानात घट झाली आहे.
नागपुरात सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ८३ टक्के होती तर ‘व्हिजीबिलिटी’ ही १ ते २ किमी होती. साधारणत: हा आकडा २ ते ४ किमी इतका असतो. सकाळी बोचऱ्या वाऱ्यासह धुकेदेखील दिसून आले. कमाल तापमान सरासरीहून २ अंश सेल्सिअस कमी म्हणजेच २६.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
विदर्भात गडचिरोली (११), चंद्रपूर (१०.८), वर्धा (१०.५), यवतमाळ (१०.४), गोंदिया (१०) हे जिल्हे सोडून इतर ठिकाणी पारा १० अंश सेल्सिअसहून खाली होता. अकोल्यात ८.४, अमरावतीत ८.६, बुलडाणा येथे ८.८, वाशीममध्ये ९, ब्रम्हपुरी येथे ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले.